नाशिक : जिकडे, तिकडे, चोहीकडे… खड्डेच खड्डे..; पंचवटीत रस्त्यांची चाळण, नागरिकांना करावी लागतेय कसरत

पंचवटी : पेठ रोड, मार्केट यार्ड, पेठ रोड - तारवालानगर रिंग रोड सिग्नल, नवीन आडगाव नाका येथील मुख्य रस्त्यावरील खड्डे. (छायाचित्रे - गणेश बोडके)
पंचवटी : पेठ रोड, मार्केट यार्ड, पेठ रोड - तारवालानगर रिंग रोड सिग्नल, नवीन आडगाव नाका येथील मुख्य रस्त्यावरील खड्डे. (छायाचित्रे - गणेश बोडके)

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
येथे गेल्या काही वर्षांत कोट्यवधी रुपयांचे नवीन रस्ते करून जुन्या रस्त्यांची दुरुस्ती झाली. परंतु, पहिल्याच पावसाने या रस्त्यांची अक्षरश: वाट लागली. पहिले खड्डे बुजत नाहीत, तोच पुन्हा आलेल्या पावसात अगोदरची मलमपट्टी उघडी पडत आहे. आता अवघ्या पंचवटीतील रस्ते खड्ड्यात गेले आहेत. मोठ्या प्रमाणात पाण्याचे डबके आणि चिखलदेखील झाला आहे. त्यामुळे नागरिकांना कसरत करावी लागत असून, अपघातांचेही प्रमाण वाढले आहे. पंचवटीतील रस्त्यांची ही अवस्था पाहून 'जिकडे, तिकडे, चोहीकडे खड्डेच खड्डे', असे म्हणण्याची वेळ आली आहे.

पंचवटीत गेल्या अडीच ते तीन वर्षांत कोट्यवधी रुपयांचे रस्ते तयार करण्यात आले. मात्र, आज त्यांची अवस्था बिकट झाली आहे. गेल्या तीन वर्षांत उखडले नाहीत, इतके रस्ते यंदा उखडले असून, काँक्रिटीकरण केलेले मोजके काही रस्ते सोडले, तर एकही रस्ता असा नाही की, ज्यावर खड्डा नाही. खड्ड्यांच्या प्रश्नावर प्रशासन मात्र तांत्रिक कारण सांगून चालढकल करण्याचा प्रयत्न करीत आहे. रस्त्यांची चाळणी झाल्याने ठेकेदारांना नोटिसा बजावून रस्ते दुरुस्त करण्याचे आदेश मनपाने दिले आहेत. त्यानुसार कामे सुरू असल्याचा दावा केला जात असला, तरी इतक्या कमी कालावधीत नवीन रस्ते खराब झालेच कसे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. यातील अनेक ठिकाणी स्मार्ट सिटी विभाग, पाणीपुरवठा विभाग यांनी त्यांच्या कामासाठी रस्ते खोदून ठेवलेले आहेत, मात्र ते पूर्णपणे बुजवले गेलेले नाहीत.

उखडलेले रस्ते …
पंचवटीतील जुना आडगाव नाका, नवीन आडगाव नाका, सेवाकुंज, निमाणी, मखमलाबाद रोड, रामवाडी, हनुमानवाडी, दिंडोरी रोड, पेठ रोड, हिरावाडी, अमृतधाम, औरंगाबाद रोड, चोपडा लॉन्सजवळील रस्ता, अमृतधाम ते मखमलाबाद रिंग रोड, नांदूर नाका, जत्रा हॉटेल परिसर, आडगाव, म्हसरूळ, मेरी ते बळी मंदिर रिंग रोड.

परिस्थिती पुन्हा 'जैसे थे'च…
पावसाने उघडीप दिल्यानंतर रस्त्यातील खड्डे, मुरूम, कच आणि पेव्हरब्लॉक यांच्या साहाय्याने बुजवले जात आहेत. मात्र, पुन्हा पाऊस आल्यानंतर हे सर्व वाहून जाते व परिस्थिती पुन्हा 'जैसे थे'च होत आहे. त्यामुळे नागरिक व वाहनचालक मात्र वैतागले आहेत. परंतु, यावर प्रशासनाकडे कोणताही कायमस्वरूपी उपाय नसल्याचे दिसून येत आहे. ही परिस्थिती पावसाळा संपेपर्यंत तशीच राहते की काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news