वयानुसार किती तासांची झोप आवश्यक? | पुढारी

वयानुसार किती तासांची झोप आवश्यक?

नवी दिल्ली : सध्याच्या ताणतणावाच्या आणि धावपळीच्या जीवनात अनेकांना रात्रीची झोप घेणेही कठीण झाले आहे. मात्र कमी झोप किंवा अनिद्रेने अनेक प्रकारच्या शारीरिक व मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सात ते आठ तासांची शांत झोप घेणे हे तन-मनाच्या विश्रांतीसाठी व आरोग्यासाठीही गरजेचे आहे. वयानुसार आपल्याला किती झोप घेणे गरजेचे आहे याचेही एक कोष्टक आहे.

सहा ते नऊ वर्षे वयोगटातील बालकांसाठी नऊ ते अकरा तासांची झोप आवश्यक आहे. बारा ते सोळा वर्षे वयोगटातील मुलांसाठी आठ ते 10 तासांची झोप आवश्यक असते. 18 ते 64 वर्षे वयोगटातील लोकांसाठी सात ते नऊ तासांची झोप गरजेची आहे. तसेच 65 वर्षांपुढील वृद्धांसाठी सात ते आठ तासांची झोप गरजेची आहे.

शांत झोप यावी यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन हे उत्तेजक द्रव्य असते. त्यामुळे झोप उडते व रात्री वारंवार लघुशंकेला जावे लागू शकते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी चार ते सहा तास आधी चहा-कॉफीचे सेवन करू नये. दिवसाचे जेवण भरपूर घ्यावे, पण रात्रीचा आहार हलका असावा. तसेच तिखट व मसालेदार पदार्थ खाणे रात्रीच्या वेळी टाकावे. त्यामुळे पित्त व अपचनाचा त्रास उद्भवून झोपेत व्यत्यय येऊ शकतो.

काही लोक सकाळी व्यायाम करण्याऐवजी सायंकाळी उशिरा व्यायाम करतात. यामुळेही निद्रानाशाचा त्रास होण्याची शक्यता असते. व्यायाम करणे हे सकाळच्या वेळीच लाभदायक ठरते. संध्याकाळी व्यायाम करायचा असेल तर तो झोपण्यापूर्वी किमान चार तास आधी करावा, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Back to top button