नाशिक : मनपामध्ये आयुक्त नसताना ‘आरोग्य’मध्ये बदल्या

नाशिक : क्स-रे काढण्यासाठी प्रतीक्षेत असलेले दिव्यांग रुग्ण व त्यांचे नातेवाईक.
नाशिक : क्स-रे काढण्यासाठी प्रतीक्षेत असलेले दिव्यांग रुग्ण व त्यांचे नातेवाईक.
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली होऊन दहा दिवस उलटले असूनही नाशिक महापालिकेला नवे आयुक्त मिळालेले नाहीत. तसेच एका प्रभारी आयुक्तांकडून दुसर्‍या प्रभारींकडे पदभार दिला गेल्याने, या दोन्ही घटना नाशिक महापालिकेच्या इतिहासात बहुदा प्रथमच घडल्या असाव्यात. अशात महापालिकेचा 'स्वच्छंद' कारभार सुरू असल्याच्या एक ना अनेक घटना समोर येत असून, आता त्यात मनपा आरोग्य विभागाची भर पडली आहे. आरोग्य विभागाने आयुक्तांच्या गैरहजेरीतच अंतर्गत बदल्या केल्याने 'गोलमाल'ची चर्चा महापालिका वर्तुळात रंगत आहे. एकीकडे आरोग्य खात्यात मनुष्यबळ कमी असल्याचे सातत्याने बोलले जात असताना बदल्यांचा घाट का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नाशिक : बिटकोतील एक्स-रे मशीन बंद असल्याने दिव्यांग रुग्णांना रुग्णवाहिकेतून डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात आणताना.
नाशिक : बिटकोतील एक्स-रे मशीन बंद असल्याने दिव्यांग रुग्णांना रुग्णवाहिकेतून डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात आणताना.

नाशिकरोड येथील बिटको रुग्णालय व कथडा येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयासह इतर रुग्णालयांमध्ये मनुष्यबळाचा अभाव असल्याचे सातत्याने सांगितले जाते. असे असून आयुक्त नसताना आरोग्य विभागात अंतर्गत बदल्या करण्याचा सपाटा सुरू आहे. बिटको रुग्णालयातील चार ते पाच कर्मचार्‍यांच्या बदल्या शहरातील इतर मनपा रुग्णालयांत केल्या. मात्र, या कर्मचार्‍यांच्या जागी दुसर्‍या कर्मचार्‍यांची नियुक्ती केली नसल्याने त्या विभागाशी संबंधित रुग्णांची प्रचंड हेळसांड होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. अगोदरच बिटको रुग्णालय हे आरोग्यसेवेपेक्षा समस्यांमुळेच अधिक चर्चेत असते. आता प्रमुख विभागांतील कर्मचार्‍यांच्या बदल्या इतरत्र झाल्याने या विभागाला कोणीही वाली नसल्याची स्थिती आहे. अगोदरच महापालिकेत पदोन्नतीचे प्रकरण जोरदार चर्चिले जात आहे. या प्रकरणातील 'घोडे'बाजार चव्हाट्यावर आल्याने मुख्यमंत्र्यांनीच या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. अशात आरोग्य विभागातील बदल्या वादाच्या भोवर्‍यात सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आरोग्य अधिकार्‍यांनी बदल्या करताना रिक्त जागांवर नवीन कर्मचारी नेमण्याबाबतचा कोणताही विचार केला नसल्याने, रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. बिटको रुग्णालयात चार ते पाच कर्मचारी बदलले असून, रिक्त जागेमुळे त्या विभागात येणार्‍या रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. – जगदीश पवार, माजी नगरसेवक.

एक्स-रे मशीनमधील बिघाड उमजेना
बिटको रुग्णालयातील एक्स-रे मशीनमधील बिघाड संबंधित तज्ज्ञांनाही उमजत नसल्याची बाब समोर येत आहे. परिणामी गेल्या महिनाभरापासून मशीन बंद असून, एक्स-रेसाठी आलेल्या रुग्णांना खासगी रुग्णालयात आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे, तर अपंगांना रुग्णवाहिकेत कोंबून डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात आणले जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून हे मशीन केव्हा दुरुस्त होईल हा प्रश्न असून, आता मॅन्युफॅक्चरिंग करणार्‍या कंपनीच्या संबंधित तज्ज्ञांनाच बोलाविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

कामाच्या सोयीनुसार या बदल्या केल्या असून, त्या तात्पुरत्या स्वरूपात आहेत. खातेप्रमुखांना त्याबाबतचा अधिकार असून, नंतर आयुक्तांची मान्यता घेता येते. या बदल्या कमी मनुष्यबळ असलेल्या ठिकाणी केल्या आहेत. बिटकोत तुलनेने बर्‍यापैकी मनुष्यबळ असल्याने तेथील काही कर्मचार्‍यांची अन्यत्र बदली केली आहे. – डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news