वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
वणी मुळाणे रस्त्यावर मुळाणे येथील ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने या रस्त्यावर वृक्षारोपण केले. पावसाळ्यापूर्वी वणी मुळाणे रस्त्याचे जवळपास अडीच किलोमीटर डांबरीकरण करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराकडून हे काम करून घेतले होते. मात्र, अवघ्या दोन आठवड्यात हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. यामुळे या परिसरातील लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मुळाणे ग्रामपंचायत सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांनी रस्त्यावर खड्ड्यात वृक्षारोपण करत निषेध व्यक्त केला. दोन महिन्यापूर्वी झालेले रस्त्याचे काम निकृष्ट झाले आहे. याबाबत मुळाणे सरपंच ललिता राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, रस्त्याचे काम चांगले करून घेण्याची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम खात्याची आहे. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केल्याने रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. अडीच किलोमीटर रस्त्यासाठी १ कोटी ८९ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते.
मुळाणे गावच्या सरपंच ललिता राऊत, काँग्रेस महिला तालुका अध्यक्ष ललिता खांडवी, ग्रामस्थ सुकदेव गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य, यांनी रस्त्यावर जाऊन वृक्षारोपण केले. तसेच, रस्त्याचा दर्जा किती निकृष्ट आहे हे रस्ता हाताने उकरून दाखवला. अगदी पातळ डांबरीकरणाचा थर असून खाली मुरूम आहे. मुरूमावरच डांबरीकरण केल्याच्या आरोप येथील ग्रामस्थांनी केला.
दरम्यान, काम सुरू असताना स्थानिकांनी या कामाला विरोध केला होता. काम निकृष्ट होत असल्याच्या तक्रारी करूनही सरकारी यंत्रणेने काम होऊ दिले. ग्रामस्थांच्या १२ वर्षाच्या पाठपुराव्याने या रस्त्याला मंजुरी मिळाली. हा रस्ता गावकऱ्यांना, शाळकरी मुलांना, महिलांना, शेतकऱ्यांना वणीला जोडणारा आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालय, स्थानिक बाजारपेठा, दळणवळणसाठी सोयीची असल्याने लोकांना याचा फायदा होणार होता. मात्र, अवघ्या दोन महिन्यात रस्ता खराब झाल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजीची भावना आहे. प्रशासकीय स्तरावर दखल घेऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई करून हा रस्ता पुन्हा तयार करावा, अन्यथा ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
हेही वाचा :