नाशिक: क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागामुळे देश स्वतंत्र : ना. गिरीश महाजन

नाशिक : राष्ट्रध्वजाला मानवंदना देताना ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन. समवेत राधाकृष्ण गमे, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, अ‍ॅड. राहुल ढिकले, बी. जी. शेखर पाटील, गंगाथरन डी., डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जयंत नाईकनवरे, सचिन पाटील, लीना बनसोड आदी.
नाशिक : राष्ट्रध्वजाला मानवंदना देताना ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन. समवेत राधाकृष्ण गमे, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, अ‍ॅड. राहुल ढिकले, बी. जी. शेखर पाटील, गंगाथरन डी., डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जयंत नाईकनवरे, सचिन पाटील, लीना बनसोड आदी.
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील अनेक ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांच्या आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदान आणि त्यागातून देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. त्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण 'याचि देही, याचि डोळा' अनुभवतो आहोत, हे सर्वांचे भाग्य आहे. नाशिकच्या जनतेने या चळवळीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष भाग घेऊन स्वातंत्र्याप्रति आपली श्रद्धा सिद्ध करताना त्यात यश मिळवले, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी (दि.15) आयोजित स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनाचे ध्वजारोहण ना. महाजन यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे व अ‍ॅड. राहुल ढिकले, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलिस अधीक्षक सचिन पाटील, जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड व इतर विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ना. महाजन म्हणाले की, नाशिकच्या जनतेने देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी स्वत:ला पूर्णपणे झोकून दिले होते. प्रत्येकाला आस होती ती फक्त स्वातंत्र्यप्राप्तीची. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे, तात्या टोपे यांसारख्या क्रांतिकारी विभूतींच्या रूपाने इतिहासाने याची नोंद ठेवली आहे. नाशिकच्या जनतेने स्वातंत्र्यलढ्यात आपले देशकार्य अगदी नेटाने केले. याच काळात नाशिकमध्ये देशप्रेम, स्वातंत्र्य या भावनांचाही प्रचार व प्रसार झाला. अभिनव भारतासारख्या क्रांतिकारी संघटनांचा उदय व विकास नाशिक परिसरात झाल्याने नाशिक एक क्रांतिकारकांचे केंद्र म्हणून नावारूपास आले. स्वातंत्र्य प्राप्तीसाठीच्या अनेक घडामोडी देशासह महाराष्ट्रात आणि नाशिकमध्येही घडल्या आहेत. त्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करताना आज प्रत्येक गाव, शहर, जिल्हा संपूर्ण देश तिरंग्यातून न्हाऊन निघत आहे, अशी भावना महाजन यांनी व्यक्त केली. याप्रसंगी ना. महाजन यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या विविध संस्था, जिल्हा परिषद, पोलिस विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

यशस्वी उद्योजक घडविणार : 2022-23 या वर्षात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत राज्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्तस्वरूप देण्यासाठी 15 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर या कालावधीदरम्यान महाराष्ट्र स्टार्टअप व नावीन्यता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेचे उद्घाटन गिरीश महाजन यांनी हिरवा झेंडा दाखवून केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर इतिहासातील 'सुवर्णपान' :
स्वातंत्र्यप्राप्तीसाठी शस्त्र हातात धरण्याशिवाय पर्याय नाही हे ठासून सांगणारे वि. दा. सावरकर हे नाशिकचे भूषण आहे. 'ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला' ही मातृभूमीची हाक जपणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाशिकच्या इतिहासातील 'सुवर्णपान' आहे, अशी भावना ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी विभागीय आयुक्तालयातील कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केली. ना. महाजन म्हणाले की, स्वातंत्र्य चळवळीत कलेक्टर जॅक्सनची विजयानंद थिएटरमध्ये हत्या करणारे हुतात्मा अनंत कान्हेरे नाशिकच्या क्रांतिकारकांच्या इतिहासातील महत्त्वाचे क्रांतिकारक आहेत. प्राणांची आहुती देऊन स्वातंत्र्याचा ध्वज फडकविण्यात हुतात्मा कान्हेरेंचा मोलाचा वाटा आहे. आज आपण जी 'हर घर तिरंगा' मोहीम अभिमानाने राबवतो आहोत या मोहिमेला हुतात्मा अनंत कान्हेरेंच्या इतिहासाची अमृतगाथा लाभली आहे. ब्रिटिश राजसत्तेला हादरे देणारे, नव्हे त्यांना सळो की पळो करून सोडणारे क्रांतिकारी तात्या टोपे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील येवल्याचा. तात्या टोपेंची जन्मभूमी येवला येथे त्यांचे भव्य स्मारक व्हावे यासाठी केंद्र सरकारने 10 कोटी 90 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. येवला तालुक्यातील बाभूळगाव येथे 3.50 हेक्टर जागेवर हे स्मारक उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे, असे ना. महाजन यांनी सांगितले. तसेच येत्या काळात देशाला भ्रष्टाचार मुक्त करून येणार्‍या युवापिढीला अधिक सक्षम करण्यासाठी 'खेलो इंडिया'च्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर खेळाडूंना संधी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही ना. महाजन यांनी सांगितले.

अनेक चळवळींचा स्वातंत्र्यलढ्यात जन्म : साधू-संतांची पावनभूमी, पवित्र तीर्थक्षेत्र, दक्षिण काशी म्हणून नावलौकिक असलेला आपला नाशिक जिल्हा ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक अशा विविध परंपरेने नटलेला आहे. आधुनिक काळात तर नाशिक हे औद्योगिक शहर म्हणून जगाच्या नकाशावर नावारूपाला आले आहे. प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक अशी अखंड ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातदेखील महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात विविध संस्थांच्या व सुधारणांच्या दृश्य, अदृश्य स्वरूपातून अनेक चळवळींचा जन्म झाला. या चळवळींचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध नाशिककरांशी आल्याने त्यांनीही यामध्ये आपला सहभाग नोंदवला, असल्याचे ना. महाजन यांनी सांगितले.

सत्कारार्थी असे : विभागीय आयुक्तालयात ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते पोलिस अधिकारी, विविध व्यक्ती व संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. सत्कारार्थी पुढीलप्रमाणे-
संस्था : एसएमबीटी रिसर्च सेंटर, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, उभाडे जि. प. शाळा (ता. इगतपुरी), भोसला अ‍ॅडव्हेंचर फाउंडेशन, वैनतेय संस्था, आपत्ती व्यवस्थापन पथक, चांदोरी, नाशिक व्हायबर्स अ‍ॅण्ड रेस्क्युअर्स असोसिएशन, शोध व बचाव पथक नाशिक.
गटविकास अधिकारी : बागलाण, नांदगाव, येवला, कळवण, पेठ, त्र्यंबकेश्वर.
सरपंच व ग्रामसेवक : कसबे-सुकणे, हिरेनगर, अजमेर सौंदाणे, बोराळे, जायखेडा, रावळगाव.
पोलिस व अन्य विभाग अधिकारी : सहायक पोलिस निरीक्षक सुनील गीत, पोलिस उपनिरीक्षक माणिक गायकर, सार्वजनिक बांधकाम विभाग शाखा अभियंता सचिन शेळके. विजय चव्हाण (जातेगाव), नीरज शेवाळे (पळसे), प्रसाद हळदे (सायखेडा), वैभव वाघ (देवगाव), समीर पठाण (भालूूर), पुंडलिक पाटील (शिरसाठे).

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news