कराड : 75 महिलांच्या हस्ते ध्वजारोहण | पुढारी

कराड : 75 महिलांच्या हस्ते ध्वजारोहण

कराड; पुढारी वृत्तसेवा : कराड तालुक्यातील येणके गावात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अर्थात 75 वा स्वातंत्र्य दिन गावातीलच 75 विधवा माता, भगिनींच्या हस्ते 75 ध्वज फडकवून विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्ताने सावित्रीच्या लेकींना मानसन्मान देण्यात आला. यापुढे गावातील विधवा महिलांना विधवा असे न संबोधता त्यांचे ‘संघर्ष भगिनी महिला’ असे नामकरणही करण्यात आले.

पती निधनानंतर प्राप्त झालेल्या वैधव्यामुळे जीवनातील आनंद हिरावून गेलेल्या विधवा महिलांनी स्वतःच्या हस्ते 75 ध्वज फडकवल्याने त्यांच्या चेहर्‍यावर खर्‍या अर्थाने स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद दिसून येत होता. आजपर्यंत विधवा भगिनींच्या हस्ते कधीही ध्वजारोहण झाल्याचे ऐकिवात नसल्याने या अमृत महोत्सवानिमित्त आमच्या हातून ध्वजारोहण करून आम्हाला जो सन्मान दिलात त्याबद्दल जीवन कृतार्थ झाल्याच्या भावना विधवा भगिनींनी व्यक्त केल्या. तीन हजार लोकसंख्या येणके गावांमध्ये सर्वेअंती एकूण 137 विधवा महिला आढळून आल्या. महाराष्ट्रातील काही मोजक्याच गावांनी विधवा प्रथा बंद करण्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेतला आहे. मात्र येणके गावातील ग्रामसेवा सार्वजनिक प्रतिष्ठान, ग्रामपंचायत येणके व सर्व ग्रामस्थ यांनी एक पाऊल पुढे जाऊन या स्त्रियांना केवळ हळदीकुंकवाचा मान न देता, भारत देशाची अस्मिता असणार्‍या तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्याचा मान दिला. ग्रामसेवा सार्वजनिक प्रतिष्ठान, ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थ यांनी विधवा प्रताविरोधी ठोस निर्णय घेतला. आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विधवा माता-भगिनींच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. सकाळी सात वाजल्यापासून तरूण भगिनीपासून अगदी 90 वर्ष वयातल्या वृद्ध महिला शाळेच्या प्रांगणाकडे उत्साहाने जमा होत होत्या. समारंभासाठी ग्रामसेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, आशा महिला, बालवाडी सेविका, शिक्षक, ग्रामस्थ, गावातील महिला, विकास सेवा सोसायटीचे पदाधिकारी झटत होते. सकाळी नऊ वाजून 35 मिनिटांनी अख्खा गाव हा ऐतिहासिक ध्वजारोहण समारंभाचे साक्षीदार होण्यासाठी शाळेच्या प्रांगणामध्ये एकत्र आले होते. या अमृत महोत्सवी ध्वजारोहण प्रसंगी पं. स. माजी सभापती आप्पासाहेब गरुड, सरपंच सौ. निकहत मोमीन, उपसरपंच नीलम गरूज सर्व सदस्य, ग्रामसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक एस.के.पाटील, उपाध्यक्ष दादासाहेब कदम, प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव भरत कदम, सेवानिवृत्तअभियंता सुनील गरूड, एम. एन. गरुड, तंटामुक्तीचे अध्यक्ष दिनकर गरुड, उपाध्यक्ष जगन्नाथ कदम. धनंजय पाटील, पोलिस पाटील प्रदीप गरूड, ग्रा. प. सदस्य अमोल पाटील, सोसायटीचे चेअरमन राहुल गरुड, राहुल पाटील, अजय पाटील, आनंदा गरुड, रूपाली पाटील, ग्रामसेवक सीमा माने, आशा सेविका मनीषा गरुड वैशाली जाधव, मुख्याध्यापिका रूपाली कुराडे, काटू सर , संग्राम पवार, अंगणवाडी सेविका ,आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच पोतलेच्या आनंदराव चव्हाण विद्यालय मुख्याध्यापक पवन पाटील,शिक्षक,विद्यार्थी यांची उपस्थिती होती. टिळक हायस्कूलच्या संगीत शिक्षिका सौ. संगीता काणे, सतीश काणे, प्राध्यापिका सौ. सुखदा विदार व टिळक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. ग्रामसेवा प्रतिष्ठानचे सचिव भरत कदम यांनी सूत्रसंचालन केले. सोसायटीचे माजी चेअरमन धनंजय पाटील यांनी खाऊ वाटप केले.

येणके गावात ऐतिहासिक निर्णय

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 विधवा महिलांच्या हस्ते 75 ध्वज फडकवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि तो 15 ऑगस्ट रोजी सत्यात उतरवला. सामाजिक क्रांतीच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी विधवा विरोधी प्रथांना कडाडून विरोध केला होता. त्यांच्याच कार्याचा वसा आणि वारसा जोपासत येणके ग्रामस्थांनी विधवा प्रथा बंदी तर केलीच.मात्र विधवा महिलांना 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 75 ध्वज फडकावून करण्यात आली.

Back to top button