नाशिक : पुढारी वृत्तसेवा
केंद्राच्या राष्ट्रीय नदी कृती योजनेंंतर्गत महापालिकेने आपल्या चार मलनिस्सारण केंद्रांच्या क्षमतावाढीचा सुमारे 530 कोटींचा प्रस्ताव केंद्र शासनाला सादर केला आहे. अमृत- 2 अंतर्गत टाकळी आणि पंचक या दोन केंद्रांच्या क्षमतावाढीबाबत 332 कोटींचा प्रस्ताव याआधीच सादर केला असून, प्रस्ताव मंजूर न झाल्यास केंद्र शासनाकडे असलेला प्रस्तावच मंजूर होण्याची शक्यता आहे.
शहरात निर्माण होणार्या सांडपाण्यावर प्रक्रिया व्हावी यासाठी महापालिकेने आठ सिव्हरेज झोन निर्माण केले आहेत. त्यानुसार झोनमध्ये रहिवासी भागातील सांडपाणी वाहून नेण्याकरता सुमारे 1919 किमी लांबीच्या मलवाहिका टाकण्यात आलेल्या आहेत. 18 पंपिंग स्टेशनद्वारे सहा मलनिस्सारण केंद्रामध्ये सांडपाणी वाहून नेले जाते. महापालिकेच्या आठ मलनिस्सारण केंद्रांद्वारे 350 दशलक्ष लिटर (एमएलडी) सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. तपोवन, आगरटाकळी, चेहेडी, पंचक, गंगापूर गाव आणि पिंपळगाव खांब या सहा एसटीपी झोनमध्ये मलनिस्सारण केंद्रे कार्यान्वित आहेत. केंद्रांची एकूण क्षमता 392.50 एमएलडी इतकी आहे. 392.50 एमएलडी क्षमतेच्या केंद्रांपैकी तपोवन, आगरटाकळी, चेहेडी व पंचक या चार झोनमधील 342.50 एमएलडी क्षमतेचे केंद्र 2015 पूर्वी कार्यान्वित आहे. केंद्रे उभारण्यात आले तेव्हा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार त्यांची संरचना होती. परंतु, आता केंद्र व राज्य प्रदूषण मंडळाच्या नियमावलीत तसेच निकषांमध्ये बदल करण्यात आल्याने एसटीपी केंद्रांचे आधुनिकीकरण आणि क्षमतावाढ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने नवीन मापदंडानुसार मलजलशुद्धीकरण केंद्र अद्ययावत करण्यात येणार आहेत. तपोवन, आगरटाकळी, चेहेडी व पंचक या चार मलजलशुद्धीकरण केंद्रांचा अहवाल महापालिकेने शासनाच्या पर्यावरण विभागाकडे ऑक्टोबर 2021 मध्ये सादर केला होता. राज्य नदीसंवर्धन योजनेंंतर्गत सचिव स्तरावरील प्रदत्त समितीने जून 2022 मध्ये मान्यता देऊन सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्र सरकारला जुलै 2022 मंजुरीस्तव सादर केला होता. त्यावर राष्ट्रीय नदीसंवर्धन संचालनालयाने प्राथमिक छाननी करून सुधारित अहवाल सादर करण्याची सूचना केली होती. त्यानुसार महापालिकेने 530.31 कोटींचा सुधारित प्रकल्प अहवाल केंद्र सरकारला सादर केला आहे. आगरटाकळी व पंचक या दोन मोठ्या मलनिस्सारण केंद्राच्या क्षमतावाढीचा प्रस्ताव सादर केला असून, एकूण 332 कोटींचा प्रस्ताव अमृत दोन योजनेंतर्गत सादर करण्यात आला आहे. अमृत दोन योजनेंंतर्गत प्रस्ताव मंजूर न झाल्यास केंद्र शासनाकडे असलेला दुसरा प्रस्ताव मंजूर होण्याची मनपाला अपेक्षा आहे.
अमृत दोन या केंद्र शासनाच्या योजनेंंतर्गत 332 कोटींचा एक आणि 530 कोटींचा दुसरा असे दोन प्रस्ताव तयार करून ते सादर करण्यात आले आहेत. यामुळे दोनपैकी कोणताही एक प्रस्ताव मंजूर होऊन त्याकरता निधी मिळू शकतो. – शिवाजी चव्हाणके, अधीक्षक अभियंता, मलनिस्सारण.