नगर : पुढारी वृत्तसेवा : महापालिका नगरसेवकांचे सुमारे सात महिन्याचे मानधन निधीअभवी रखडले आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही नगरसेवकांना अद्याप मानधन मिळालेले नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. महापालिकेच्या वतीने नगरसेवकांना किरकोळ खर्चासाठी दरमहा दहा हजारांचे मानधन दिले जाते. लोकमतातून निवडून आलेले 68 तर, 5 स्वीकृत असे 73 नगरसेवक आहेत. त्यांना दरमहा दहा हजार रुपये मानधन दिले जाते. त्यातून त्यांना स्टेशनरी व अन्य खर्चासाठी वापर करता येतो. मात्र, गेल्या सात महिन्यांपासून त्यांना मानधन देण्यात आलेले नाही.
नगर सचिव विभागातून मानधनाची बिले अकाउंट विभागात देण्यात आली आहेत. मात्र, अद्यापि नगरसेवकांना मानधन मिळालेले नाही. महापालिकेला दरमहा कर्मचार्यांचा पगार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी लागतो. त्यामुळे नगरसेवकांना मानधन देण्यासाठी तिजोरीत नेहमी खडखडाट असतो. नगरसेवकांच्या मानधनासाठी प्रत्येक महिन्याला सात लाख 30 हजार रुपये लागतात. सात महिन्यांपासून सुमारे 51 लाखांचे मानधन थकीत आहेत. नगरसेवकांचे मानधन मिळावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.