नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा ; वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे घराच्या बाहेर निघणे जिकरीचे बनले आहे. अशा परिस्थितीत लहान मुलांनी उन्हात कसे जावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. उन्हाच्या वाढत्या झळांमुळे तालुक्यातील जऊळके येथील विद्यार्थ्यांला शाळेतून घरी जाताना चक्कर आल्याची घटना घडली. त्यामुळे पालकांनी येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला निवेदन देऊन शाळेची वेळ सकाळी ७ ते १० अशी करण्याची मागणी केली आहे.
राज्यभर पारा चाळिशीच्या पुढे जात असताना शाळा आणि विद्यार्थी हे समीकरण उन्हामुळे गुंतागुंतीचे बनत आहे. जिल्हा परिषदेच्या व इतर माध्यमिक शाळांमध्ये वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी येतात. काही विद्यार्थी एक ते दोन किलोमीटर पायी किंवा सायकलवर देखील उन्हामध्ये प्रवास करत असतात. त्यातच राज्यभर उन्हाचा पारा वाढत असून सकाळी ९ वाजेपासून उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात होत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांची वेळ सकाळी ७.४५ ते ११.४५ वाजेची आहे. याशिवाय माध्यमिक शाळा देखील सकाळी ७ ते ११ ते १२ वाजेच्या दरम्यान भरत आहे. त्यामुळे शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना भर उन्हात घरी जावे लागते. यामुळे विद्यार्थी आजारी पडण्याचे प्रमाणही वाढीस लागले आहे.
जऊळके येथील पांडुरंग शिंदे यांचा मुलगा शाळेतून येताना दुपारच्या सुमारास उन्हात चक्कर येऊन पडला. डॉक्टरांकडे नेले असता उन्हामुळेच चक्कर आल्याचे निदान झाले. अशा घटना घडत असल्याने सर्व शाळांची वेळ सकाळी ७ ते १० वाजेपर्यंतची करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह पालकांनी येथील शिक्षण विभागाकडे केली आहे.
विद्यार्थी हितासाठी शिक्षण विभागाने हा निर्णय अमलात आणावा अशी मागणी त्यांनी केली आहे. या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख श्रावण देवरे, युवा तालुका अध्यक्ष मच्छिंद्र जाधव, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर नरोडे, उपाध्यक्ष किरण बारे, पालक दिगंबर लोंढे, दत्तात्रय शिंदे, माणिक दौंडे, चेतन कदम, ज्ञानेश्वर बुल्हे, अर्जुन हंडोरे, ज्ञानेश्वर सोमवंशी आदींच्या सह्या आहेत.
"ग्रामीण भागातील मुलांना शाळेतून परततांना उन्हामुळे चक्कर येण्याच्या घटना समोर येत आहे. शाळेतून आल्यानंतर मुले अक्षरशा: हिरमुसून जातात. सकाळी नऊ वाजपासूनच उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात होते. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता शाळेची वेळ सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत करण्याची मागणी आम्ही केली असून सर्व पालकांची देखील हीच मागणी आहे."
-मच्छिंद्र जाधव, युवा अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, येवला