नाशिक : कांद्याच्या हमीभावासाठी देवळ्यात रास्ता रोको; शेतकरी संघटनेचे आंदोलन

देवळा : नायब तहसीलदार दिनेश शेलूकर यांना निवेदन देताना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, जिल्हा उपाध्यक्ष देवीदास पवार आदींसह कांदा उत्पादक शेतकरी. (छाया : सोमनाथ जगताप)
देवळा : नायब तहसीलदार दिनेश शेलूकर यांना निवेदन देताना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, जिल्हा उपाध्यक्ष देवीदास पवार आदींसह कांदा उत्पादक शेतकरी. (छाया : सोमनाथ जगताप)
Published on
Updated on

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा

कांद्याला हमीभाव मिळण्यासाठी मंगळवारी (दि.३०) शेतकरी संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला राज्य कांदा उत्पादक, स्वाभिमानी शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती पक्षासह विविध शेतकरी संघटनांनी आपला पाठिंबा दर्शवला. सुमारे तासभर चाललेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतुकीस खोळंबा निर्माण झाला होता.

कांद्याला मिळणारा कवडीमोल भाव, त्याकडे राज्य आणि केंद्र सरकारने केलेले दुर्लक्ष, वीज व पाण्याची गंभीर समस्या या गोष्टींकडे राज्य आणि केंद्र सरकारचे दुर्लक्ष आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी देवळा तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने येथील पाचकंदीलजवळ विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत एक तास रास्ता रोको केले. यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष देवीदास पवार, जिल्हा अध्यक्ष अर्जुन बोराडे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख शशिकांत भदाने, राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे, संपर्कप्रमुख कुबेर जाधव, युवा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील, बाळासाहेब चौधरी आदी उपस्थित होते. आंदोलनात शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते फुला जाधव, दादाजी जाधव, बाळासाहेब शेवाळे, शांताराम जाधव, शरद जोशी विचार मंचचे विनोद पाटील, प्रवीण आहिरे, शैलेंद्र कापडणीस, माणिक निकम, बाळू निकम, कैलास कोकरे, दशरथ पूरकर आदींसह शेकडो कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीने नायब तहसीलदार दिनेश शेलूकर यांना निवेदन देण्यात आले.

आर्थिक समस्यांत भर :  शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष देवीदास पवार यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. कांद्याला किमान उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा म्हणून कांदा उत्पादक शेतकरी संघटना सातत्याने पाठपुरावा करत आहे. राज्य आणि केंद्र सरकारने या विषयावर हस्तक्षेप करून तोडगा काढला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संपर्कप्रमुख कुबेर जाधव यांनी आपली आक्रमक भूमिका मांडताना सांगितले की, या गंभीर विषयावर सर्व शेतकरी संघटना एकत्र आल्याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार नाहीत. त्यासाठी भविष्यात राष्ट्रीय महामार्ग बंद पाडायची वेळ आली तरी मागे हटणार नसल्याचे ठामपणे सांगितले.

गळ्यात कांद्याच्या माळा :  रास्ता रोको आंदोलनाला कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून केंद्र व राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली .

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news