नाशिक : भगवान गौतम बुद्धांना अभिवादन, अनुयायांची उसळली गर्दी

नाशिक : भगवान गौतम बुद्धांना अभिवादन, अनुयायांची उसळली गर्दी
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती 'वैशाख महोत्सव' म्हणून शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्ट आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि.५) त्रिरश्मी लेणीच्या पायथ्याशी बुध्द स्मारकात साजरी करण्यात आली. तथागताला अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी उसळली होती. पांढरे कपडे परिधान करून बौद्ध अनुयायी बुद्धवंदनेसाठी जमले होते. 'बुध्दमं शरणमं गच्छामी'ने संपूर्ण आसमंत दुमदुमला.

बुध्दस्मारक येथे सकाळी १० वाजता धम्म ध्वजारोहण आणि बुध्द पूजापाठ करण्यात आले. यावेळी शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष भदन्त सुगत, भदन्त यू नागधम्मो महाथेरो, भदन्त आर्यनाग, भदन्त संघरत्न, भदन्त धम्मरक्षित, भदन्त सारीपुत्त, आमदार सीमा हिरे, माजी नगरसेवक भगवान दोंदे, दीक्षा लोंढे, राकेश दोंदे, सुदाम डेमसे, ज्येष्ठ नेते वामन गायकवाड, आदिवासी विकास विभागाचे उपआयुक्त प्रदीप पोळ, बीएमए ग्रुपचे अध्यक्ष मोहन आढांगळे आदी उपस्थित होते. त्यानंतर रक्तदान आणि आरोग्य शिबिर पार पडले.

सायंकाळी गायक चेतन लोखंडे यांचा संगीतमय कार्यक्रम झाला. यात बुद्धांच्या जीवनावर व विचारांवर आधारित गीते सादर करण्यात आली. बौध्द अनुयायांच्या गर्दीमुळे संपूर्ण परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. विविध सामाजिक संस्था, शासकीय अधिकारी कर्मचारी संघटना तसेच राजकीय पक्षांकडून अनेक ठिकाणी खिरीचे वाटप करण्यात आले. ठिकठिकाणी बुद्धांच्या मूर्ती, फोटो व विविध वस्तूंचे स्टॉल्स लागले होते.

धम्म रॅलीने वेधले लक्ष

शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (शालिमार) ते बुध्दस्मारक अशी धम्म रॅली काढण्यात आली होती. एमजी रोड, सीबीएस, त्र्यंबक नाका, सातपूर राजवाडा, स्वारबाबानगर, त्रिमूर्ती चौक, सिडको, पाथर्डी फाटा, बुध्दस्मारक असा रॅलीचा मार्ग होता. पांढरे वस्त्र परिधान करून सहभागी झालेल्या अनुयायांच्या रॅलीने लक्ष वेधून घेतला.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news