नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
मालेगाव पोलिसांनी रविवारी (दि.20) सकाळी कमालपुरा भागात छापेमारी करून अवैध कत्तलखाना उघडकीस आणला. याठिकाणी 480 किलो गोमांस जप्त करण्यात येऊन एकाला अटक झाली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, एक जण फरार आहे.
पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांच्या समूळ उच्चाटनासाठी मोहीम उघडली आहे. त्याअंतर्गत नवनियुक्त अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांनी पथक सक्रिय केले आहे. त्यांना कमालपुरा भागात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने रविवारी सकाळी साडेआड वाजता कमालपुरातील घर नंबर 632ची तपासणी केली. त्याठिकाणी साजीद खान शब्बीर खान (47) याने नऊ गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल केल्याचे आढळून आले. 76 हजार 800 रुपयांचे 480 किलो गोमांस आणि कुर्हाड, दोन सुरे असा 77 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. साजीदने चौकशीत मुश्ताक बुडी (पूर्ण नाव माहीत नाही) याच्या सांगण्यावरून जनावरांची कत्तल केल्याची कबुली दिली. पशुवैद्यकीय अधिकारी जावेद खाटीक यांच्यासमक्ष पंचनामा करण्यात आला. त्यांनी मांसाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठविले. दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिस नाईक श्याम खैरनार करीत आहेत. पोलिस उपनिरीक्षक विजय गोपाळ, हवालदार वसंत महाले, पोलिस शिपाई भूषण खैरनार, पंकज भोये यांनी ही कारवाई केली.
बेकायदेशीर गोवंश वाहतूक प्रकरणी किल्ला पोलिसांची कारवाई
मालेगाव : मनमाडकडून जळगाव चोंडीमार्गे मालेगावच्या दिशेने बेकायदेशीररीत्या गोवंश जनावरांची वाहतूक करणार्यांवर किल्ला पोलिसांनी कारवाई केली. गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी मनमाड चौफुलीवर रात्री एकच्या सुमारास पिकअप वाहन (एमएच 04, इ एल 3554) थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, चालकाने वेग वाढवत पसार झाला. चौफुलीच्या ब्रिजखालील वळणावर रस्त्याच्या कडेला वाहन धडकले. वाहनाची पाहणी केली असता त्यात नऊ गायी निर्दयीपणे बांधलेल्या अवस्थेत निदर्शनास आले. या प्रकरणी संशयित फईम खान रहीस खान (रा. इस्लामपुरा), असलम शेख आहद कुरेशी (रा. दरेगाव) व आमिर खान हमीद खान (रा. मोमीनपुरा) या तिघांविरोधात सचिन नथू भामरे यांनी फिर्याद नोंदवली. सुमारे 4 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जमा करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक किशोर नेरकर करीत आहेत.