नाशिक : पेट शॉपबाहेर झळकणार ‘वन्यजीव संरक्षण कायदा’ ; तस्करी रोखण्यासाठी वनविभागाचा उपक्रम

नाशिक : पेट शॉपबाहेर झळकणार ‘वन्यजीव संरक्षण कायदा’ ; तस्करी रोखण्यासाठी वनविभागाचा उपक्रम
Published on
Updated on

नाशिक : नितीन रणशूर
मागील काही वर्षांपासून वनगुन्हेगारीचे नाशिक केंद्रबिंदू बनले आहे. संपूर्ण नाशिक वनवृत्तात फोफावलेल्या तस्करीचा बिमोड करण्याचे आवाहन वनविभागासमोर उभे ठाकले आहे. विशेषत: वन्यजीव तस्करीचे प्रमाण जास्त असल्याचे चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर वन्यजिवांची विक्री करणार्‍या पेट शॉपच्या दर्शनी भागावर वन्यजीव संरक्षण कायद्याची प्रत लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय नाशिक वनक्षेत्रपाल कार्यालयाने घेतला आहे.

नाशिक जिल्ह्याच्या सीमा गुजरातच्या नवसारी, वलसाड व डांग या जिल्ह्यांसह धुळे, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, ठाणेपर्यंत विस्तारलेल्या आहेत. सीमावर्ती भागात मोठी नैसर्गिक साधनसंपत्ती लाभल्याने स्थानिक शिकार्‍यांना हाताशी धरून तस्करांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. वन्यजीवांच्या शिकारी, त्यांच्या अवयवांचा अवैध व्यापार व तस्करी तसेच वनसंपदेची चोरटी वाहतुकीच्या स्लिपर सेलचे नाशिक कनेक्शन वारंवार समोर येत आहे. त्यामुळे पेट शॉप वनविभागाच्या रडारवर आले आहे.

नाशिक शहरात विविध पेट शॉप येथे वनविभाग नाशिक (पश्चिम भाग) कार्यालयामार्फत धाडसत्र राबविण्यात येत आहे. यात मोठ्या प्रमाणात कासव, पोपट, हेजहॉग आदी दुर्मीळ वन्यजीवांचा साठा आढळून आला होता. तस्करीचे मुख्य केंद्र बनलेल्या पेट शॉपवर वनविभागाने लक्ष केंद्रित केले असून, नियमित तपासणीसह पेट शॉपमालकांची चौकशी करण्यात येणार आहे. तसेच वन्यजीव संरक्षण कायदा- 1927 व 1972 ची सविस्तर माहिती फलक पेटशॉपच्या दर्शनी भागावर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

दरम्यान, पेटशॉपमधून विक्री झालेल्या वन्यजीवांच्या ग्राहकांची माहिती वनविभागाकडून संकलित केली जाणार आहे. संबंधित ग्राहकांच्या घरी टाकण्यात आलेल्या धाडसत्रात नोंदणीकृत नसलेले वन्यजीव आढळून आल्यास त्यांचेविरुद्ध सक्त कार्यवाही करण्याची तयारी वनविभागाने केली आहे.

'परिवेश'वर नोंदणी अनिवार्य
वन्यजीव संरक्षण कायदा- 1927 व 1972 अन्वये अनेक वन्यजीवांना संरक्षण प्रदान करण्यात आले आहे. तर पेट शॉपमधून खरेदी केलेले अथवा अन्य स्रोतांमार्फत मिळविलेले व विदेशी प्रजातीच्या वन्यजीवांची नोंदणी परिवेश प्रणालीवर करणे अनिवार्य आहे. मात्र, बहुतांश ग्राहकांकडून नोंदणी केली जात नसल्याने तेही अडचणीत येणार आहे.

वन्यजीव संरक्षण कायद्याचे सुमारे 100 फलक तयार करून पेटशॉपच्या दर्शनी भागावर लावले जाणार आहेत. या फलकांच्या माध्यमातून ग्राहकांना संरक्षित वन्यजीवांची तसेच स्वत:जवळ बाळगल्यास होणार्‍या शिक्षेची माहिती मिळेल. त्यातून अनवधानाने होणारी संरक्षित वन्यजीवांची खरेदी टळेल. खरेदी कमी झाली तर तस्करीलाही आळा बसू शकेल.
-विवेक भदाणे,
वनक्षेत्रपाल, नाशिक

हे आहेत संरक्षित वन्यजीव
शेकरू, तरस, गिधाड, बिबट, काळवीट, कासव, पोपट, साळींदर, मांडूळ, घुबड, इंद्रजाल, सर्व प्रकारचे सर्प, घोरपड, मोर, मुनिया, तितर, चंडोल.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news