नाशिक : नऊ लाख घरे, आस्थापनांवर राष्ट्रध्वज; जिल्हावासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हर घर तिरंगा
हर घर तिरंगा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित 'हर घर तिरंगा' उपक्रमाला जिल्हावासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 9 लाख 12 हजार 416 घरे, शासकीय-निमशासकीय कार्यालये तसेच दुकाने व खासगी आस्थापनांवर राष्ट्रध्वज फडकविण्यात आला.

स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशवासीयांच्या मनात देशभक्तीची भावना कायमस्वरूपी राहावी, या उद्देशाने वैभवशाली इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी 'हर घर तिरंगा' उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा प्रारंभ शनिवारी (दि. 13) करण्यात आला. या अंतर्गत जिल्ह्यातील 9 लाखांहून अधिक घरे, शासकीय कार्यालये तसेच दुकाने व इतर खासगी कार्यालयांवर तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. ग्रामीण भागात सर्व विभाग मिळून तब्बल 5 लाख 91 हजार 713 ठिकाणी तिरंगा फडकले, तर नाशिक महापालिका क्षेत्रात 1 लाख 97 हजार 621 ठिकाणांवर नागरिकांनी तिरंगा डौलाने फडकवला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील वातावरण देशभक्तीमय झालेले पाहायला मिळाले.

ग्रामविकासमंत्री महाजन यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण
स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या वर्धापनदिनी (दि. 15) राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण झाले. याबरोबरच नागरी शासकीय अधिकारी राष्ट्रीय पोशाखात, तर गणवेशधारी अधिकारी हे नियमानुसार पोशाखात उपस्थित होते.

जिल्ह्यात येथे फडकला तिरंगा :

जिल्हा परिषद 5,91,713

नाशिक मनपा 1,97,621

मालेगाव मनपा 67,526

नगर परिषद; पंचायत 55,556

एकूण 9,12,416

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news