नाशिक : नैसर्गिक नाला बुजविला; दोन बिल्डरांवर गुन्हा दाखल

नाशिक : पाइप टाकून नैसर्गिक नाले बुजविण्याविरोधात पालिकेने केलेली कारवाई.
नाशिक : पाइप टाकून नैसर्गिक नाले बुजविण्याविरोधात पालिकेने केलेली कारवाई.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पंचवटी विभागातील म्हसरूळ भागात नैसर्गिक नाला बुजविणार्‍या दोन बिल्डरांवर महापालिकेने पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. महापालिका आयुक्त रमेश पवार यांच्या या दणक्याने नाशिक शहरातील काही बिल्डरांमध्ये खळबळ उडाली असून, नैसर्गिक नाले बंदिस्त करून बांधकामे उभ्या केलेल्या बड्या हस्तींची भीतीने गाळण उडाली आहे. दरम्यान, मनपाने म्हसरूळमधील त्या नाल्यावरील अतिक्रमण हटविले आहे.

म्हसरूळ येथील नैसर्गिक नाल्यात सिमेंट पाइप टाकून बुजविण्यात येत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी मनपा आयुक्त रमेश पवार यांच्याकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत आयुक्तांनी बांधकाम आणि नगररचना विभागाला सूचना करत कारवाईचे आदेश दिले होते. नाशिक शहरात जवळपास 65  इतके नैसर्गिक नाले आहेत. मात्र, यातील बहुतांश नाल्यांवर काही बिल्डरांनी कामे केली असल्याने नाले बुजले आहेत. त्याचबरोबर गोदावरी नदीच्या लाल आणि निळ्या पूररेषेतदेखील अनेक बांधकामे झाली असून, त्यामुळे गोदावरीचे पात्र अरुंद होत आहे. शहरात काही विशिष्ट बिल्डरांकडून राजकीय लोकांच्या मदतीने अनधिकृत बांधकामे उभारण्याच्या प्रकारात मोठी वाढ झाली आहे. बिल्डरांच्या या प्रकारात मनपातील काही अधिकारीही सहभागी असल्याने अनधिकृत बांधकामे सर्रास सुरू आहेत. शहरातील नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रणांची पाहणी सुरू असतानाच, पंचवटीतील म्हसरूळ शिवारातील स. क्र. 71 व क्र.171 (वरणवाडी परिसर) मध्ये असलेल्या नैसर्गिक नाल्यात सिमेंटचे पाइप टाकून तो बुजविण्याचा प्रकार समोर आला आहे. तिवारी आणि अग्रवाल नामक दोन बिल्डर हे महापालिकेची परवानगी न घेताच परस्पर बांधकाम करत असल्याची तक्रार आयुक्तांकडे स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली होती. या तक्रारींच्या आधारे पवार यांनी बांधकाम व नगररचना विभागाला संबधितांवर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार कारवाई करण्यात आली असून, ही कारवाई थांबविण्याकरता मनपा प्रशासनावर दबावतंत्राचा अवलंब सुरू करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

शहरातील इतर नाल्यांचीही माहिती घेणार : या प्रकरणी पोलिस उपआयुक्त अमोल तांबे यांच्याशी चर्चा झाली असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. जेणेकरून शहर परिसरात अशा प्रकारे अनधिकृत काम करण्याची कुणाची हिंमत होणार नाही. ठाणे, मुंबई, पुणे या शहरांमध्ये नैसर्गिक नाल्यांकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष झाल्याने पावसाचे पाणी साठण्यासह इतरही घटनांना आज सामोरे जावे लागत आहे. तसा प्रकार नाशिकबाबत होऊ नये, यादृष्टीने दक्षता घेतली जाणार आहे. त्यानुसार शहरातील इतरही नैसर्गिक नाल्यांची माहिती घेण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त रमेश पवार यांनी सांगितले. एमआरटीपी कायद्यानुसार नैसर्गिक नाले बुजवून अनधिकृत बांधकाम केल्यास त्यासाठी एक वर्षाची शिक्षेची तरतूद असल्याची माहिती आयुक्त पवार यांनी दिली.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news