नाशिक : मविप्र निवडणुकीचे वारे, कामाला लागले सारे

नाशिक : मविप्र निवडणुकीचे वारे, कामाला लागले सारे
Published on
Updated on

सिन्नर : (जि. नाशिक) संदीप भोर
'मविप्र' ही नाशिक जिल्ह्यात सर्वांत मोठी शैक्षणिक संस्था आहे. पदाधिकारी व संचालक मंडळाचा पंचवार्षिक कार्यकाळ संपुष्टात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर गेले काही दिवस आधीपासूनच सत्ताधारी आणि विरोधक कामाला लागले होते. सिन्नर तालुक्यात गेल्या महिना-दोन महिन्यांपासून या निवडणुकीची वातावरणनिर्मिती सुरू आहे. आता प्रत्यक्षात निवडणुकीचा बिगुल वाजल्याने वातावरण धुमसून निघणार आहे.

नाशिक जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. नितीन ठाकरे यांची निवड झाल्यानंतर सिन्नर वकील संघातर्फे त्यांचा जाहीर नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. या सत्काराआडूनच निवडणुकीचे फुत्कार ऐकायला मिळाले होते. एकेकाळचे डॉ. वसंतराव पवार आणि त्यांच्या पश्चात नीलिमा पवार यांचे कट्टर किंबहुना 'किचन मेंबर' मानले जाणारे माजी संचालक कृष्णाजी भगत यांच्या पुढाकाराने हा सत्कार समारंभ पार पडला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. पण, पवार फॅमिली व भगत यांच्यात बिनसले असल्याचे सभासदांच्या नजरेतून सुटले नाही. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत नीलिमा पवार यांनी भगत यांना थांबवून मावळते संचालक हेमंत वाजे यांना उमेदवारी दिली. वाजे संचालक झाले. मात्र, भगत यांनी पॅनलसाठी कामच केले नाही, असा आरोप त्यांच्यावर झाल्याचे बोलले जाते. व्यक्तिगत भेटीतही नीलिमा पवार या भगत यांच्याशी फटकून वागत राहिल्या. त्यामुळेच भगत यांनी अ‍ॅड. ठाकरे यांच्याशी जवळीक साधल्याची चर्चा आहे.

ज्याअर्थी नीलिमा पवार यांनी कृष्णाजी भगत यांना दूर सारले. त्याअर्थी मावळते संचालक हेमंत वाजे यांना पवार यांच्या पॅनलमधून तालुका संचालकपदासाठी उमेदवारी ग्राह्य धरली जात आहे. आरंभी वाजे आणि भगत यांच्यात वितुष्ट निर्माण झाले आहे, असाही समज होता. मात्र तसे काही नसल्याचे पुढे स्पष्ट झाले. वाजे हे गेल्या महिनाभरापासून सभासदांच्या भेटीगाठी घेत असल्याचे त्यांची निवडणुकीसाठीची तयारी सुरू असल्याचे दिसत होते. येथील होरायझन अकॅडमी, सायाळे व कोमलवाडी येथील शाळांच्या नूतन इमारतींच्या लोकार्पणाचा सोहळा थाटात संपन्न झाला. त्याचे उत्तम नियोजन हेमंत वाजे व सहकार्‍यांनी केले होते.

गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये पवार यांच्या पॅनलमधून आरंभी ज्यांच्या उमेदवारीची जोरदार झाली आणि सरतेशेवटी त्यांच्याच नावावर फुली मारली गेली, असे ज्येष्ठ सभासद म्हणजे डुबेरे येथील श्रीमंत पेशवे पतसंस्थेचे चेअरमन नारायणशेठ वाजे. त्यांच्या नावाची यंदाही काही सभासदांनी शिफारस केली असल्याची चर्चा आहे. मात्र, दोन वेळचा कटू अनुभव पाहता नारायणशेठ उमेदवारी मिळविण्यासाठी किती आग्रही असतील हा प्रश्नच आहे. किंवा जोपर्यंत पॅनलचे नेतृत्व आदेश देत नाही, तोपर्यंत चर्चेत रहायचे नाही अशी त्यांची भूमिका असावी.

ठाकरे-कोकाटे यांच्या पॅनलमध्ये सिन्नरच्या जागेसाठी कोणाला संधी मिळणार याबाबतही चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती अ‍ॅड. राजेंद्र चव्हाणके यांच्याही नावाची चर्चा होती. गेल्या दोन-तीन दिवसांपासून माजी संचालक राजेंद्र तथा सत्येंद्र नवले यांनीही सभासदांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. दुसरीकडे नगरपालिकेची निवडणूकही तोंडावर आहे. या निवडणुकीत कोकाटे समर्थक म्हणून चव्हाणके कुटुंबातून कोणाची उमेदवारी होणार असल्यास विद्यमान स्थितीत नवले यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृष्णाजी भगत ठाकरे गटाकडून इच्छुक असले तरी आमदार कोकाटे यांची अनुकूलता-प्रतिकूलता महत्त्वाची मानली जात आहे. अशोक मुरकुटे हे सिन्नरमधील सभासदही यंदा ठाकरे गटाकडून इच्छुक असल्याचे समजते. गतवेळी हेमंत वाजे यांच्याविरोधात ठाकरे गटाने त्यांना उमेदवारी दिली होती. मात्र, मुरकुटे यांना पराभूत करून वाजे संचालकपदी विजयी झाले होते. त्यामुळे इच्छुकांच्या यादीत मुरकुटे कितपत टिकाव धरतील हादेखील प्रश्न आहे. सिन्नर तालुका संचालकपदासाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. येत्या काही दिवसांतच उमेदवारांवर शिक्कामोर्तब होणार आहे. मात्र, इच्छुकांची उत्सुकता ताणली जाणार हे मात्र खरे.

सत्ताधार्‍यांविरुद्ध अ‍ॅड. ठाकरे-आ. कोकाटे बांधणार मोट
आमदार माणिकराव कोकाटे यांनी यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत थेट सहभागाची घोषणा केली आहे. ते अध्यक्षपदासाठी लढतील, अशी अटकळ बांधली जात असून, गेल्या तीन-चार महिन्यांपासून ते मविप्र निवडणुकीच्या मैदानात उतरतील, अशी चर्चा होती. ती खरी ठरली आहे. ते कोणाची सोबत करणार हा प्रश्नही लोंबकळत होता. मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार नाशिक दौर्‍यावर असताना अ‍ॅड. ठाकरे यांच्यासमवेत कोकाटे यांनी पवारांची भेट घेतली. या भेटीला 'विरोधकांची भेट' असे संबोधले गेले. त्यावरून नीलिमा पवार यांच्याविरुद्ध ते ठाकरे यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट झाले. नीलिमा पवार यांची संस्थेतील कार्यपद्धती म्हणजे संस्था 'प्रायव्हेट लिमिटेड कंपनी' असल्यासारखी असल्याचे टीकास्त्र सोडत आमदार कोकाटे यांनी निवडणुकीतील प्रचाराचा रोख आणि भूमिका स्पष्ट केली आहे. ठाकरे व कोकाटे मिळून विरोधकांची मोट बांधत असल्याचेही दिसते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news