नाशिक-मुंबई सहापदरी रस्त्याचे आता काँक्रिटीकरण : नितीन गडकरी यांची घोषणा

नाशिक-मुंबई सहापदरी रस्त्याचे आता काँक्रिटीकरण : नितीन गडकरी यांची घोषणा
Published on
Updated on

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृतसेवा
नाशिकपासून मुंबईपर्यंत संपूर्ण रस्त्याचे सहापदरी काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव आलेला असून, तो मंजूर होईल, असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. मुंबई-आग्रा महामार्गाला समृद्धी महामार्ग पिंप्रीसदोला मिळणार असून, त्यामुळे मुंबई ते नाशिक हा प्रवास सुखकर होईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय महामार्गाच्या एकूण २२६ किमी लांबीच्या १८३० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि कोनशिला अनावरण समारंभ गडकरी यांच्या हस्ते आज ऑनलाइन रिमोटचे बटन दाबून पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. इगतपुरी तालुक्यातून जाणार्‍या समृद्धी महामार्गाला जोडणार्‍या गोंदे ते पिंप्रीसदो फाटा या सहापदरी मार्गासाठी केंद्राने ८६६ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या कामाचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते मुंबई-आग्रा महामार्गावरील इगतपुरी येथील गार्डन व्ह्यू येथे पार पडले. तसेच या मार्गासह इतरही सुमारे दोन हजार कोटींच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले.

भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह खासदार डॉ. सुभाष भामरे, खासदार हेमंत गोडसे, आमदार माणिकराव कोकाटे, मोहमद खालिक, डॉ. राहुल आहेर, सीमा हिरे, राहुल ढिकले, हिरामण खोसकर, माजी आमदार काशीनाथ मेंगाळ उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डी. गंगाथरन, प्रांत तेजस चव्हाण, गोरख बोडके आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मुंबईचे सीईओ अंशुमली श्रीवास्तव, नवी मुंबईचे संतोष शेलार, नाशिक एनएचआयचे अधिकारी बी. एस. साळुंके, सार्वजनिक बांधकामाच्या अधिकारी वर्षा आहिरे, बी. आर. पाटील, प्रशांत खोडस्कर, डॉ. पाटील यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

मुंबई हा आता नाशिकचा भाग आहे. याच्यामुळे नक्कीच समृद्धी मोठ्या प्रमाणावर येईल. या भागात एमआयडीसी आणि लॉजिस्टिक पार्क मोठ्या प्रमाणात आहेत. ते समृद्धी महामार्ग आणि मुंबई-आग्रा व मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस हायवेजवळ होत आहे. या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, नाशिक थेट जेएनपीटीला जोडले जाणार आहे. वडपेवरून थेट मुंबई-दिल्ली हायवेवरून आपल्याला जाता येईल आणि वडपेवरून दहा ते अकरा तासांमध्ये दिल्लीला माल पोहोचणार आहे. मुंबई-दिल्ली हायवे हा एक लाख कोटी रुपयांचा प्रकल्प जवळपास पूर्ण झालेला आहे. सुरत-चेन्नई ग्रीन एक्स्प्रेस हायवेमध्ये नाशिक जिल्ह्यात दहा हजार कोटी रुपयांचे काम झाले असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.

हा प्रकल्प एकंदर सोळाशे किलोमीटरचा असून, सध्या प्रवासासाठी ३६ तास वेळ लागतो. मात्र, आता नवीन प्रकल्पामुळे हा मार्ग केवळ बाराशे नव्वद किलोमीटर लांबीचा झाला आहे. त्यामुळे अवघ्या दहा तासांमध्ये चेन्नईला पोहोचता येणार आहे. दक्षिणेत जाण्याकरिता नाशिकमधून हा महामार्ग नाशिक, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर अशा पाच जिल्ह्यांतून जाणार आहे. नाशिक ते अहमदनगर, बीड, उस्मानाबाद व सोलापूर या महाराष्ट्रातल्या शहरातदेखील एक्स्प्रेस हायवे झाल्याने त्यामुळे नाशिकपासून सोलापूरला दीड ते पावणेदोन तासांत जाता येईल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

नाशिक शहरातील विविध रस्त्यांबाबत रिंगरोडबाबत अनेक समस्या आहेत. तसेच नाशिक येथे दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो. त्यासाठी शहराबाहेरील पेठ रोड आदी भागातील रस्त्याच्या कामाकडे आपण लक्ष द्यावे, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी यावेळी केली. याप्रसंगी वाहतूकमंत्री नितीन गडकरी तालुक्यातील भगतवाडी येथील वृद्धाश्रमाला भेट देऊन पाहणी केली.

हे आहेत महत्त्वाचे प्रकल्प
नाशिक जिल्ह्यातील गोंदे ते पिंप्रीसदो फाटा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ वर २० किलोमीटर लांबीच्या ८६६ कोटींचे सहापदरीकरण, राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५ या ३७ किलोमीटर लांबीच्या सटाणा ते मंगरूळ खंडाचे रुंदीकरण दर्जोन्नतीकरणाच्या ४३९ कोटींचे काम, दहावा मैल जऊळके-दिंडोरी व आंबेबहुला राष्ट्रीय महामार्ग ४.३ कि.मी.च्या २११ कोटी रुपयांचा भुयारी व उड्डाणपूल, खंबाळे ते पहिणे व शतगाव ते अंबोली या ३० किलोमीटर लांबीच्या मार्गाचे ३८ कोटींच्या निधीतून मजबुतीकरण तसेच नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर-रेवाडी फाटा ते सिन्नर या नऊ किलोमीटर मार्गाच्या मजबुतीकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे.

वाहतूक कोंडीचा फटका
घोटी टोलनाक्यावरील वाहतूक कोंडीचा फटका गडकरी यांच्याच कार्यक्रमाला बसला. घोटी नाक्यावर २ किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्याने नाशिकहून कार्यक्रमाकडे जाणारे शेकडो कार्यकर्ते टोलनाक्यावर अडकून पडल्याने १८०० कोटी रुपयांच्या कामाला २०० लोकदेखील कार्यक्रमस्थळी उपस्थित नव्हते. कार्यक्रमाच्या आयोजक केंद्रीय मंत्री भारती पवार आणि कार्यकर्त्यांनी पळापळ करून शाळकरी मुले, रस्त्यावर काम करणारे कर्मचारी यांना खुर्च्यांवर बसवून खुर्च्या भरविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोही अपयशी झाला. कार्यक्रम संपण्याच्या आधी मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या महामार्गाच्या घोटी टॅबच्या महामार्ग सुरक्षा पोलिसांनी महामार्गावर वाहतूक रोखून ठेवल्याने कसाऱ्याकडून येणाऱ्या महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news