‘लिव्ह इन पार्टनर’ची श्रद्धाहून अधिक निर्घृण हत्या | पुढारी

‘लिव्ह इन पार्टनर’ची श्रद्धाहून अधिक निर्घृण हत्या

रांची, वृत्तसंस्था : झारखंडमध्ये दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडापेक्षाही निर्घृण हत्याकांड उघडकीस आले आहे. मुंबईच्या श्रद्धाचे आफताब अन्सारीने 35 तुकडे केले होते. पण झारखंडमधील साहेबगंजच्या दिलदार अन्सारीने (25) त्याची ‘लिव्ह इन’ पार्टनर रूबिका पहाडी (22) हिचे 50 वर तुकडे केले आणि ते तुकडे पोत्यात भरून घरातच ठेवले होते. नंतर काही तुकडे परिसरातील निर्जन ठिकाणी फेकले. भटकी कुत्री ती खात असताना हा प्रकार समोर आला.

लोकांनी पोलिसांना माहिती दिली. रिबिकाचे शिर अद्याप सापडलेले नाही. मृत तरुणी हिंदू आदिवासी पहाडिया समाजातील होती. पोलिसांनी दिलदारला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने तुकडे फेकलेली ठिकाणे सांगायला सुरुवात केली असून पोलिसांनी मंझटोला येथील एका बंद घरातून मृतदेहाचे आणखी अनेक तुकडे जप्त केले.

काही तुकडे जमिनीवर विखुरलेले होते. काही तुकडे पोत्यामध्ये भरून ठेवले होते. दिलदार आणि रूबिका लिव्ह इनमध्ये होते. दिलदारच्या दुसर्‍या लग्नावरून घरात भांडणे होती. अलीकडे ती वाढलेली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. रूबिकाचे आई तसेच वडील दिलदार आणि रुबिकाच्या एकत्रित राहण्याच्या विरोधात होते.

Back to top button