नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरासह उपनगरांमध्ये नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी महापालिकेकडून जॉगिंग ट्रॅक करण्यात आले आहेत. मात्र, हे जॉगिंग ट्रॅक टवाळखोरांचे अड्डे बनले आहेत. जॉगिंग ट्रॅक परिसरात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत टवाळखोरांचा वावर राहात असल्याने तरुणी-महिलांसह ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. टवाळखोरांकडून महिलांसह ज्येष्ठांना लक्ष्य केले जात असून, पोलिसांकडून गस्त घातली जात नसल्याने सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जॉगिंग ट्रॅकवर भल्या पहाटे तसेच सायंकाळी व्यायामासाठी येणार्या नागरिकांची संख्या लक्षणीय असते. काही जॉगिंग ट्रॅकवर पथदीप नसल्याने रात्रीच्या वेळी तिथे मद्यपींच्या ओल्या पार्ट्या रंगतात. काही जॉगिंग ट्रॅकच्या आवारात गाजरगवताचे साम्राज्य पसरल्याने टवाळखोरांना लपण्याठी आयती जागा मिळाली आहे. त्यामुळे महिलांना फिरण्यासाठी जॉगिंग ट्रॅकचा वापर सूर्यास्तानंतर करता येत नाही. महिलांच्या छेडछाडीच्या घटनांमध्येही वाढ झाली असून, ज्येष्ठ नागरिकांना धमकविण्यापर्यंत टवाळखोरांची मजल गेली आहे. शहरातील मोजक्या मैदानांवरील जॉगिंग ट्रॅकशिवाय इतर ट्रॅक धुळीचे आखाडेच बनलेले दिसून येत आहेत. मैदानावर तसेच जॉगिंग ट्रॅकवर अनेक वाहनचालक व काही टवाळखोर आपली वाहने उभी करून निघून जात असल्याने स्थानिकांसह जॉगिंगसाठी येणार्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. संपूर्ण दिवसभर वाहने पार्क केलेली असल्याने जॉगिंगसाठी येणार्यांना त्याचा नाहक त्रास होतो. महापालिकेची मैदाने, उद्याने, जॉगिंग ट्रॅक अनधिकृत वाहनतळ बनल्याचे नागरिक सांगत आहेत.
स्वच्छतागृहांअभावी कुचंबना
बहुतांश जॉगिंग ट्रॅकवर येणार्या नागरिक, विद्यार्थी, खेळाडूंना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. जेथे स्वच्छतागृह सुरू आहे, तिथे पाण्याची कमतरता आहे. ट्रॅक परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जातो. ट्रॅकवरील स्वच्छतागृहांची देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे. स्वच्छतागृहांअभावी महिलावर्गासह ज्येष्ठ नागरिकांची कुचंबना होत आहे.
पोलिस गस्त वाढविण्याची मागणी
जॉगिंग ट्रॅक परिसरातील लोखंडी तसेच इतर बाकांचा ताबा टवाळखोर घेतात. ठिकठिकाणी टोळके उभे राहतात. त्यामुळे जॉगिंगसाठी येणार्या नागरिकांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. टवाळखोरांना हटकणार्या नागरिकांना शिवीगाळ, मारहाण आणि धमक्या दिल्या जातात. त्या पार्श्वभूमीवर जॉगिंग ट्रॅक परिसरात पोलिस गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.