कोरेगाव भीमा(ता. शिरूर); पुढारी वृत्तसेवा : सणसवाडी येथील नरेश्वर मंदिर परिसरात पुणे-नगर रोड ते नरेश्वर मंदिरभोवताली असलेली वनराई पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. परंतु, नुकताच सुरू झालेला उन्हाळा व पाण्याच्या अभावामुळे ही वनराई सुकून चालली आहे.
उन्हाचा प्रभाव चालू झाला असून, अजून पुढे कडक उन्हाळा लागणार आहे. परंतु, अगोदरच संपूर्ण वनराई 60 ते 70 टक्के सुकलेली आहे. भविष्यात दुर्लक्ष केले तर कडक उन्हाने व पुरेसे पाणी न मिळाल्याने संपूर्ण वनराई जळून नष्ट होईल, यात तिळमात्र शंका नाही.
उन्हाळ्यात याच वनराईमध्ये आजूबाजूचे ग्रामस्थ सावलीत बसायला तर लहान मुले खेळायला येतात. यंदा वनराई सुकून गेल्याने थंडगार सावलीपासून समस्त ग्रामस्थ वंचित राहणार आहेत. वनराईत फक्त लिंबोळीचेच वृक्ष काही ठिकाणी हिरवेगार दिसत आहेत. पुढील काळात तेही कडक उन्हाच्या प्रभावाने व पाणी न मिळाल्याने जळून जाण्याची शक्यता आहे. परिणामी, यंदा येथील ग्रामस्थांना कडक उन्हाळा थंडगार झाडांखाली न घालवता आपल्या घराभोवती असलेल्या छोट्या-मोठ्या झाडांखाली व घरातच काढावा लागणार आहे.