नाशिक : मुलींनी रोडरोमिओंना चोप देत केले पोलिसांच्या हवाली

1)टवाळखोरांना धडा शिकविणार्‍या मुलींना प्राउड रामदंडी बॅजने गौरविले. 2)उठाबशा काढताना टवाळखोर तरुण
1)टवाळखोरांना धडा शिकविणार्‍या मुलींना प्राउड रामदंडी बॅजने गौरविले. 2)उठाबशा काढताना टवाळखोर तरुण
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मुली-महिलांच्या संरक्षणाचा प्रश्न अत्याचार, छेडछाड यांसारख्या घटनांमुळे अधिकच गंभीर बनला आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय अथवा फिरण्यासाठी घरातून बाहेर पडतो आहोत, परंतु, पुन्हा सुरक्षिपणे घरी परत येऊ की नाही, याची खात्री नसते. पण, निदान स्वसंरक्षणाचे शिक्षण घेतलेले असले तर त्याचा नक्कीच फायदा होतो. याचा प्रत्यय सोमेश्वर येथील एका घटनेवरून आला आहे. मुलींची छेडछाड करणार्‍यांना चोप देत पोलिसांच्या हवाली करण्याची हिंमत भोसला मिलिटरी कॉलेजच्या काही रामदंडी मुलींनी केली आहे.

महाविद्यालयाच्या रामदंडी मुली फिरण्यासाठी सोमेश्वर येथे गेल्या होत्या. तेथील काही रोडरोमिओंनी त्यांना अपशब्द वापरत छेडण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थिनींनी रोडरोमिओंना समज देऊनही न ऐकल्याने अखेर त्यांनी आपल्याला मिळालेल्या संरक्षणाच्या धड्यांचा वापर करत रोडरोमिओंना चोप दिला. आपल्यासोबत केलेले वर्तन रोडरोमिओंनी इतरांबरोबर करण्याचे पुन्हा असे धाडस करू नये, यासाठी त्यांना चोप देण्यापुरते न थांबता पोलिसांच्या स्वाधीन केले.

सैनिकी शिक्षणात सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे भोसला मिलिटरी कॉलेज परिचित आहे. या महाविद्यालयात सैनिकी शिक्षणाबरोबरच स्वयंशिस्त, आत्मसंरक्षणाचे धडे देऊन रामदंडीचे व्यक्तिमत्त्व कणखर, धाडसी बनविले जाते. महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहणार्‍या रामदंडी 10 मुली आऊटपास घेऊन सोमेश्वर येथे देवदर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन घेतल्यावर यापैकी काही रामदंडी मुली बर्फाच्या गोळ्याचा आस्वाद घेत होत्या. त्याचवेळी बाजूला पाच टवाळखोर बसलेले होते. या मुलींना पाहून त्यांनी अपशब्द बोलण्यास सुरुवात केली. मुलींनी सुरुवातीला दुर्लक्ष केले. परंतु, त्यांचे टोमणे मारणे, अपशब्द सुरूच राहिल्याने रामदंडींनी धडा शिकविला.

या रामदंडी मुलींनी टवाळखोरांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण, ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यांनी आमच्यातीलच बाजूला उभ्या असलेल्या रामदंडी मुलीच्या पायावर गुटखा थुंकला. त्याचा जाब विचारला असता टवाळखोरांनी भांडण सुरू करत मुलींना धक्के मारायला सुरुवात केली. एका मुलीवर हातही उचलला. त्यामुळे सर्व रामदंडींनी सांघिकतेचे दर्शन दाखवत रोडरोमिओंना चोप देण्यात सुरुवात केली. यानंतर मुलींनी तातडीने 100 नंबरला कॉल करत पोलिसांना बोलावले.

रामदंडींच्या धाडसी कृतीमुळे महाविद्यालयातर्फे प्रा. एस. यू. कुलकर्णी, प्रा. प्रभावती जगताप, प्रा. आर. एस. भोळे, प्रा. पूर्णिमा झेंडे, प्रा. हिरा वाघ, प्रा. अनिता चंद्रात्रे यांच्या हस्ते 'प्राउड रामदंडी' हा बॅज देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. उन्मेष कुलकर्णी, कॅम्पस को-ऑर्डिनेटर प्रा. डॉ. संजय कंकरेज उपस्थित होते. मेजर विक्रांत कावळे यांनी सूत्रसंचालन केले.

पोलिस तत्परतेने हजर
पोलिसांना कॉल जाताच काही वेळातच पोलिस तत्परतेने सोमेश्वर मंदिर परिसरात दाखल झाले. संबंधित पाचही जणांना ताब्यात घेत त्यांना रामदंडींसमोर उठाबशा काढायला लावत अशा प्रकारचे वर्तन करणार नसल्याचे सांगत ताब्यात घेतले. या घटनेनंतर रामदंडी मुली तातडीने महाविद्यालयाच्या वसतिगृहाकडे परतल्या.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news