कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलन कोल्हापुरात होत आहे. दोन दिवसीय होणार्या या संमेलनाचे उद्घाटन मंगळवारी 11 वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते होणार आहे. कसबा बावडा येथील महासैनिक दरबार हॉल येथे दि. 5 व 6 एप्रिल रोजी हे संमेलन होईल.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. न्या. डॉ. मदन महाराज गोसावी तर स्वागताध्यक्ष म्हणून संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे असणार आहेत. कार्यक्रमाला पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, ज्येष्ठ कवयित्री प्रा. डॉ. अरुणा ढेरे, लोककला अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे उपस्थित राहणार आहेत. पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर, संस्कृती मंत्रालय भारत सरकार यांच्यावतीने साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्घाटन सोहळ्यापूर्वी सकाळी 6 वाजता करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे पूजन ह.भ.प. रंगनाथ महाराज नाईकडे व आनंदराव गायकवाड यांच्या हस्ते होईल. सकाळी 8 वाजता ग्रंथदिंडी निघणार असून याचा प्रारंभ महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते होणार आहे. 10 वाजता ग्रंथ दालनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे यांच्या उपस्थितीत होईल. 11 वाजता चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय चित्रकार सुहास बहूलकर व जे. जे. आर्ट स्कूलचे संचालक प्रा. डॉ. राजीव मिश्रा यांच्या हस्ते होईल.
याशिवाय दिवसभर ग्रंथ स्मरणिकेचे विमोचन, बीजभाषण, संत शिरोमणी पुरस्कार वितरण, विश्वात्मक संत जीवन गौरव पुरस्कार, विदेशी अभ्यासक शोधनिबंध वाचन, भक्ती संप्रदाय आणि विश्वात्मकता परिसंवाद, 'भक्ती वसा की व्यवसाय?' महाचर्चा आणि भक्ती संगीत महोत्सव असे विविध उपक्रम दिवसभर होणार आहेत. दरम्यान, साहित्य संमेलनाची तयारी सोमवारी पूर्ण झाली.