

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कला शिकवत असताना विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या कला शिक्षकास न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. अशोक रघुनाथ नागपुरे (५७, रा. गजपंथ स्टॉप, म्हसरूळ) असे या कला शिक्षकाचे नाव आहे. त्याने सप्टेंबर २०१८ ते फेब्रुवारी २०२० या कालावधीत अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केला.
पंचवटी पोलिस ठाण्यात पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी अशोक नागपुरे याने रेखाटन शिकवण्याच्या बहाण्याने, दुचाकीवर पाठीमागे बसून वारंवार विनयभंग केला. याचप्रकारे त्याने दुसऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचाही विनयभंग केला. त्यामुळे पंचवटी पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करून नागपुरे यास पकडले. पोलिस उपनिरीक्षक डी. एस. पाटील यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. सुलभा सांगळे व रेश्मा जाधव यांनी युक्तिवाद केला. त्यांनी सहा साक्षीदार तपासले. त्यात नागपुरे विरोधात गुन्हा सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. व्ही. भाटिया यांनी नागपुरे यास शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस अंमलदार एम. एम. पिंगळे, पी. आर. चौधरी यांनी कामकाज पाहिले.