‘जी-20’मधील पंतप्रधान मोदींच्या भूमिकेचे अमेरिकेकडून कौतुक | पुढारी

‘जी-20’मधील पंतप्रधान मोदींच्या भूमिकेचे अमेरिकेकडून कौतुक

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : जी-20 शिखर परिषदेच्या वतीने जारी करावयाच्या संयुक्त निवेदनातील मुद्द्यांबाबत सर्व सहभागी राष्ट्रांची सहमती मिळवण्याचे अशक्य वाटणारे काम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य झाले, त्यामुळे आण्विक अस्त्रांच्या वापराबाबतच्या वाढत्या धोक्याबाबत या संयुक्त निवेदनात उल्लेख करता आला, असे गौरवोद्गार अमेरिकेने काढले आहेत.

अमेरिकेचे मुख्य राष्ट्रीय सुरक्षा सहसल्लागार जॉन फिनर यांनी हे उद्गार काढले आहेत. भारतीय अमेरिकी समुदायासमोर बोलताना फिनर म्हणाले की, सामाईक विषयांवर एक जागतिक भूमिका आणि अजेंडा ठरवण्यासाठी अमेरिका आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आता याबाबतीत भारताकडे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सहकारी म्हणून आशेने बघत आहेत. इंडोनेशियात बाली येथे झालेल्या जी-20 शिखर परिषदेत कळीच्या विषयांवर सर्वसहमती व्हावी यासाठी मोदी यांनी केलेले प्रयत्न स्तुत्य आहेत. आण्विक अस्त्रांचा वापर आणि विविध देशांसाठी संवेदनशील विषयांवर सर्वच सदस्य देशांची सहमती होणे अवघड असते. त्या-त्या देशांचे हित बघून त्यात बाधा न आणता सर्वसहमती मिळवण्याचे काम मोदी यांनी केले. भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजितसिंग संधू म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष बायडेन यांच्या आतापर्यंत 15 भेटी झाल्या आहेत.

बालीच्या ताज्या भेटीत दोन नेत्यांमधील मधुर आणि मैत्रीपूर्ण संबंधांचे दर्शन जगाला झाले आहे. दोन देशांतील संबंध आगामी काळात आणखी वृद्धिंगत होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Back to top button