नाशिक : आहार पुरवणार्‍या ठेकेदाराच्या गोदामात तांदळाची 300 पोती, शिक्षण संचालनालय पथकाची पाहणी

नाशिक : आहार पुरवणार्‍या ठेकेदाराच्या गोदामात तांदळाची 300 पोती, शिक्षण संचालनालय पथकाची पाहणी
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
निकृष्ट दर्जाचा आहार पुरवठा केल्याप्रकरणी सेंट्रल किचन योजनेतील 13 ठेकेदारांना मनपाने अपात्र ठरविले होते. आता याच 13 पैकी एका ठेकेदाराच्या हिरावाडीतील ठाकरे मळा परिसरातील गोदाम तपासणीत सुमारे 300 हून अधिक तांदळाची पोती आढळून आली आहेत. याच वादग्रस्त ठेकेदारांचे जवळपास पावणेतीन कोटींचे बिल अदा करण्याचे आदेश शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या आदेशानुसार देण्यात आल्याने या विषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, संबंधित 13 ठेकेदारांच्या कामकाजाची तपासणी करण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे पथक गुरुवारी (दि.24) नाशिकला आले होते. यावेळी शहरातील काही जागरूक महिला बचत गटाच्या कार्यकर्त्यांनी गोदामात साठवणूक केलेली तांदळाची पोती पथकाच्या निदर्शनास आणून दिली. विशेष म्हणजे बहुतांश तांदूळ सडलेला आढळून आल्याने विद्यार्थ्यांच्या मुखीही तो जाऊ शकला नाही. प्रकरण दडपण्यासाठी काही राजकीय पदाधिकार्‍यांनी पथक तसेच मनपा अधिकार्‍यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु, मनपा प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत रात्री उशिरापर्यंत एकूण तांदळाची पोती, वापरलेला तांदूळ, उपलब्ध तांदूळ आणि महापालिकेकडे संबंधित ठेकेदाराने तांदूळ वापराबाबत दिलेली माहिती या सर्वांचा ताळमेळ लावण्यात येत आहे. याबाबतचा अहवाल मनपा आयुक्त कैलास जाधव यांना सादर केला जाणार आहे.

विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरवठ्याचे काम 2003 पासून महिला बचत गटांकडेच आहे. असे असताना दोन वर्षांपूर्वी शासनाने सेंट्रल किचन योजनेच्या नावाखाली ठेकेदारांच्या हवाली ही योजना केली. नाशिकमध्ये 13 ठेकेदारांना अशा प्रकारचे काम दिले गेले. याबाबत शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांनी ठेकेदारांच्या कामकाजाबाबत आरोप करत ठेका रद्द करण्याची मागणी केली होती. यामुळे मनपा प्रशासनाने 13 संस्थांच्या कामाच्या ठिकाणी पाहणी केली असता अनेक त्रुटी आढळून आल्या.

यामुळे मनपाने 13 ही ठेकेदारांचा ठेका रद्द केला. यानंतर मनपाने महिला बचत गटांना काम देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली. ही प्रक्रिया अंतिम असतानाच आणि शाळा पुन्हा सुरू होत असल्याने संबंधित अपात्र ठेकेदारांना पुन्हा काम देण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यासाठी आमदार हिरामण खोसकर यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे मध्यस्थी केली. त्यातूनच ठेका रद्द केलेल्या संस्थांना शिक्षणमंत्र्यांकडे 29 जून 2019 रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्ताचा आधार घेत सुमारे 2 कोटी 69 लाख रुपयांचे बिल काढण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. बिल काढण्याबरोबरच ठेकेदारांना पुन्हा काम देण्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने खास समिती पाठवून सेंट्रल किचन शेडची तपासणी करण्याचे आदेश दिले. मात्र, याच तपासणीत महिला बचत गट प्रतिनिधींनी हिरावाडीतील एका गोदामात एका ठेकेदाराने दडवून ठेवलेले 300 तांदळाची पोती निदर्शनास आणून दिली. महिला बचत गटाच्या सुषमा शिरसाठ, सरला चव्हाण, अलका शिरसाठ, माया पगारे आदी उपस्थित होते.

आ. खोसकर म्हणतात, माझा संबंध नाही
मार्च 2020 पासून संबंधित ठेकेदाराने तांदळाचे पोते गोदामात ठेवलेले होते. दरम्यान, अपात्र ठेकेदारांवरील कारवाई मागे घेण्याकरिता काँग्रेस आ. खोसकर यांनी शिष्टाई केल्याने ही मध्यस्थी खोसकर यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. याबाबत खोसकर यांना विचारले असता त्यांनी या प्रकरणात आपला काहीही संबंध नसून चुकीच्या पद्धतीने शासनाचे तांदूळ दडवले गेले असल्यास आपण स्वत: पत्र देऊन संबंधितांवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करू, असे स्पष्ट केले.

स्वामी विवेकानंद सामाजिक शैक्षणिक सेवा संस्थेच्या गोदामालगत असलेल्या बंगल्यात पोषण आहाराच्या तांदळाची पोती महिला बचत गटांनी निदर्शनास आणून दिली आहे. त्याबाबतचा पंचनामा करण्यात आला असून, ठेकेदाराने ही तांदळाची पोती त्याचीच असल्याची कबुली दिली आहे. आयुक्तांना याबाबतचा सविस्तर अहवाल दिला जाणार आहे. संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.
सुनीता धनगर, शिक्षणाधिकारी, मनपा

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news