नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मुलास समाजकल्याण विभागात नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून धुळे जिल्ह्यातील चौघांनी महिलेस गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मीना जगताप (रा. श्रमिकनगर, सातपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयितांनी नोव्हेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत तीन लाख रुपयांना गंडा घातला आहे. संशयित भूषण पाटील-देवरे, किरण पवार, गणेश अरुण भावसार व योगेश गायकवाड यांनी मुलास नोकरी लावून देतो, असे आमिष जगताप यांना दाखवले. त्या मोबदल्यात त्यांच्याकडून संशयितांनी तीन लाख रुपये घेतले. मात्र, नोकरी न दिल्याने व संशयितांनी धमकावल्याने जगताप यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. सातपूर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.