कोल्हापूर : ‘सीपीआर’मध्ये आता प्लास्टिक सर्जरी | पुढारी

कोल्हापूर : ‘सीपीआर’मध्ये आता प्लास्टिक सर्जरी

कोल्हापूर; अनिल देशमुख :  गोरगरिबांचा आधारवड असलेल्या सीपीआरमध्ये आता प्लास्टिक सर्जरीचीही सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे आता प्रथमच सीपीआरमध्ये प्लास्टिक सर्जरी होऊ लागल्या आहेत. याचा फायदा कोल्हापूरसह कोकण, कर्नाटकातील अनेक रुग्णांना होणार आहे. प्लास्टिक सर्जन डॉ. प्रशांत चौधरी यांची सीपीआरमध्ये महिनाभरापूर्वी नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर गेल्या महिन्यात बारा प्लास्टिक सर्जरी सीपीआरमध्ये झाल्या आहेत. यामुळे प्लास्टिक सर्जरीशी संबंधित महागडे उपचार घेण्याची वेळ आता रुग्णांवर येणार नाही.

‘सीपीआर’मध्ये अपघात

मारामारी आदींसह भाजलेले रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे. अशा रुग्णांना तुटलेला अवयव, त्वचा जोडण्यासाठी प्लास्टिक सर्जन उपलब्ध नव्हता. यामुळे अशा रुग्णांना अनेकदा खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत होता. आता ही सर्व सुविधा सीपीआरमध्येही उपलब्ध होणार आहे. भाजलेले रुग्ण, मान, हात चिकटलेले रुग्ण, कुष्ठरुग्णांची वाकडी झालेली बोटे, तुटलेले हात, कान, त्वचा गेल्याने बाहेर दिसणारे हाड, जन्मजात बाळामध्ये असलेले दोष, मार लागून तुटलेल्या शिरा आदी अनेक प्रकारांसह सौंदर्याच्या द़ृष्टीने चेहर्‍याच्या सर्जरी आता सीपीआरमध्ये होणार आहेत.

प्लास्टिक सर्जरीसाठी आवश्यक उपकरणे सीपीआरमध्ये उपलब्ध आहेत. यामुळे नियुक्त झाल्यापासून आतापर्यंत 12 शस्त्रक्रिया झाल्या. आणखी उपकरणांबाबत प्रशासनाकडे मागणी केली आहे. लवकरच ती उपलब्ध होतील, त्याचा सर्वसामान्य रुग्णांना मोठा फायदा होईल.
– डॉ. प्रशांत चौधरी, प्लास्टिक सर्जन

सीपीआरमध्ये अपघातात जखमी झालेले रुग्ण तसेच भाजलेेले रुग्ण मोठ्या प्रमाणात येतात. सीपीआरमध्ये न्यूरो, युरो, पेड्रॅट्रिक, टेंटल, सीव्हीटीएस सर्जन आहेत. त्यात आता प्लास्टिक सर्जन नियुक्त केल्याने सीपीआरचा सर्जरी विभाग परिपूर्ण बनला आहे.
– डॉ. गिरीश कांबळे, वैद्यकीय अधीक्षक

Back to top button