दिंडोरी : वाघाडचे जलपूजन करताना वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर संस्थेचे अध्यक्ष अरुण घुमरे, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संजय बेलसरे, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, पाणीवापर संस्थांचे पदाधिकारी बाजीराव शिंदे, लक्ष्मीकांत वाघवकर, कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने आदी. (छाया : समाधान पाटील)
दिंडोरी : वाघाडचे जलपूजन करताना वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर संस्थेचे अध्यक्ष अरुण घुमरे, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संजय बेलसरे, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, पाणीवापर संस्थांचे पदाधिकारी बाजीराव शिंदे, लक्ष्मीकांत वाघवकर, कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने आदी. (छाया : समाधान पाटील)

नाशिक : वाघाड डावा कालव्यावर यंदा ऑटोमेशनचा प्रयोग

Published on

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा
वाघाड डावा कालव्यावर प्रायोगिक तत्त्वावर ऑटोमेशन करण्यात येणार आहे. पाणीवापर संस्थांच्या शेतकर्‍यांनी काही नवीन बाबी आत्मसात कराव्यात. पाणीवापर संस्थांनी याबाबतच्या मार्गदर्शनासाठी नाशिकला पालखेड पाटबंधारे विभागातील पाणीवापर संस्था मार्गदर्शन कक्षाचा लाभ घेण्याचे आवाहन गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संजय बेलसरे यांनी केले. तसेच जुन्या सिंचन प्रकल्पावर जलवाहिनी उभारण्यास शासनाचा नकार असल्याने तूर्त वाघाड कालव्यावर जलवाहिनीचे काम करता येणार नाही, असेही बेलसरे यांनी स्पष्ट केले.

तुडुंब भरलेल्या वाघाड धरणाचे जलपूजन गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संजय बेलसरे, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता व प्रशासक अलका अहिरराव, प्रकल्पस्तरीय संस्थेचे अध्यक्ष अरुण घुमरे दाम्प्त्यांच्या हस्ते करण्यात आले. जलपूजनानंतर शेतकरी, पदाधिकारी तसेच अभियंते यांची रब्बी हंगामपूर्व सभा झाली. सभेत प्रास्ताविक करताना प्रकल्पस्तरीय संस्थेचे संचालक शहाजी सोमवंशी यांनी अतिवृष्टीमुळे नेहमी फुटणार्‍या वाघाड कालव्याच्या भरावासाठी जलसंपदा विभागाने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली. तसेच पाणीवापर संस्थांनी शासनास भरलेल्या पाणीपट्टी रकमेचा परतावा तातडीने मिळण्याची मागणी वाघवकर यांनी केली. तर भोजापूर व कडवा प्रकल्पावर अभ्यास केलेले गोपाल चव्हाण यांनी पाणीवापर संस्थांनी पाण्याची मागणी करून ते वापरात आणले नाही, तर ते भविष्यात सिंचनापासून इतरत्र जाऊ शकते, या धोक्याकडे लक्ष वेधले.
वाघाड प्रकल्पीय संस्थेला पाणीपट्टी परताव्यात पाच टक्के वाढीची शिफारस शासनास करण्यात आलेली आहे, असे स्पष्ट करून बेलसरे म्हणाले की, प्रकल्पस्तरीय संस्थेने पाइपलाइन करण्याची मागणी आलेली आहे. परंतु जुन्या सिंचन प्रकल्पावर जलवाहिनी न उभारण्याचे शासनाचे धोरण असल्याने तूर्त तरी वाघाड कालव्यावर जलवाहिनीचे काम करता येणार नाही. तसेच अतिवृष्टीमुळे वाघाड कालव्यांची झालेली हानी वेळेत दुरुस्त करण्याचे बेलसरे यांनी यावेळी आश्वासन दिले. जलपूजनास वाघाड प्रकल्पाचे लाभक्षेत्रातील शेतकरी, प्रकल्पस्तरीय पाणीवापर संस्थांचे पदाधिकारी बाजीराव शिंदे, सागर पगारे, शहाजी सोमवंशी, शिवाजी पिंगळ, रघुनाथ कदम, रमेश पाटील, रामनाथ वाबळे, समाज परिवर्तन केंद्राचे लक्ष्मीकांत वाघवकर, कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने, उपकार्यकारी अभियंता राजेंद्र बधान, उपअभियंता हर्षद देवरे उपस्थित होते.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news