नाशिक : म्हैसवळण घाटरस्त्यात सहलीची बस उलटली; चाळीसपैकी चौघे गंभीर तर दहा जखमी

घोटी : म्हैसवळण घाटात उलटलेली बस. (छाया : राहुल सुराणा)
घोटी : म्हैसवळण घाटात उलटलेली बस. (छाया : राहुल सुराणा)
Published on
Updated on

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा
इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील नाशिक-नगर या दोन जिल्ह्यांना जोडणार्‍या अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या म्हैसवळण घाटरस्त्यात रविवारी (दि.22) दुपारी बाराच्या सुमारास विश्रामगडावरून सहलीच्या विद्यार्थ्यांना टाकेदला घेऊन निघालेल्या खासगी ट्रॅव्हल्स बस (एमएच 15 एके 1632)चे अचानक ब्रेक निकामी होऊन बस उलटल्याने दहा विद्यार्थी जखमी झाले. अन्य चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

बसचालकाने प्रसंगावधान राखत गाडी दरीत कोसळू नये म्हणून रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला असलेल्या डोंगराला घसरवल्याने मोठा अपघात थोडक्यात टळला आणि चाळीस विद्यार्थ्यांचे प्राण थोडक्यात बचावले. इस्कॉन मंदिर संस्थेतर्फे जवळपास चाळीस विद्यार्थी सहलीसाठी टाकेदतीर्थावर आले होते. त्यानंतर ते विश्रामगड (पट्टाकिल्ला) येथे भेट देऊन परतीच्या प्रवासात नाशिक-नगर जिल्हा सरहद्दीवरील वाघोबा गावाजवळ म्हैसवळण घाटात असताना बसचे ब्रेक अचानक निकामी झाले. एकाबाजूला डोंगररांगा, तर दुसर्‍या बाजूला खोल दरी, अशा ठिकाणी बाका प्रसंग गुदरला होता. परंतु बसचालकाने प्रसंगावधान राखत बस डोंगररागांना घासवत थांबवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात बसचा वेग कमी झाला आणि ती रस्त्यावरच उलटी झाली. यात दहा विद्यार्थी जखमी झाले, तर चौघे गंभीर जखमी झाले. जखमींसह सर्व विद्यार्थ्यांना गाडीतून स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर एसएमबीटी रुग्णालयाच्या दोन रुग्णवाहिकेतून तातडीने रुग्णालयात नेले. जखमींवर तेथे उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त बस शर्मा टुर्स ड ट्रॅव्हलची असून, यात इस्कॉन मंदिर संस्थेचे चाळीस विद्यार्थी होते. पोलिस प्रशासनाला सदर अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक घोटी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अनिल धुमसे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शिवाजी जुंदरे, बी. पी. राऊत, सुहास गोसावी, आर. पी. लहामटे, केशव बसते आदी पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी क्रेन बोलावून बस तेथून हटविली.

म्हैसवळण घाटातील अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी दोन कार्डियाक रुग्णवाहिका पाठवून अपघातातील जखमींना एसएमबीटी रुग्णालयात तत्काळ उपचारासाठी दाखल करून अपघात कक्षात संपूर्ण डॉक्टर, नर्स, कर्मचारी टीमसह उपचार सुरू केले. – सूरज कडलग, व्यवस्थापक, एसएमबीटी रुग्णालय, धामणगाव.

जखमी विद्यार्थ्यांची नावे
दूर्वा पाटील (13 वर्ष), चिन्मयी देशमुख (14 वर्ष), आकांक्षा प्रधान (14 वर्ष), सिद्धेश विभांडिक (14 वर्ष), सायली जोशी (13 वर्ष), मृण्मयी इरवाडकर (13 वर्ष).

एसएमबीटीकडून तत्काळ प्रतिसाद
अपघाताबाबत माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, शहाबाज शेख यांनी एसएमबीटी रुग्णालयाचे व्यवस्थापक सूरज कडलग यांच्याशी संपर्क केला व तत्काळ रुग्णालयाकडून घटनास्थळी दोन रुग्णावाहिका पाठविण्यात आल्या. तोपर्यंत जखमींना स्थानिक ग्रामस्थ शिवा फोडसे, अमोल धादवड यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढले होते.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news