नाशिक : निफाड उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष स्थापन : डॉ. सुनील राठोर

उष्माघात कक्ष www.pudhari.news
उष्माघात कक्ष www.pudhari.news

नाशिक (निफाड) : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात वाढत असलेल्या उष्म्याच्या पार्श्वभूमीवर उष्माघाताच्या रुग्णांवर तातडीने वैद्यकीय उपचार करण्यासाठी निफाड उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती निफाड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील राठोर यांनी दिली.

आरोग्य उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड उपजिल्हा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक पाचमध्ये उष्माघात कक्ष तयार करण्यात आला असून, या कक्षात खिडक्यांमधून येणारी नैसर्गिक, खेळती हवा, कूलर, पंखे, आइस पॅक इतर औषधोपचार यांची संपूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे. उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश पोटे, डॉ. साहेबराव गावले, डॉ. समाधान पाटील, डॉ. कृष्णा यादव, डॉ. योगिता गायकवाड आदींकडे रुग्णांवर उपचारांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. वैद्यकीय पथकाला रुग्णालयातील परिचारिकांचे सहकार्य लाभणार आहे.

नागरिकांनी उष्म्यापासून बचाव करण्यासाठी काळजी घ्यावी. जर कोणाला उष्माघाताचा त्रास जाणवत असेल, तर अशा रुग्णाला तातडीने निफाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करावे. – डॉ. सुनील राठोर, वैद्यकीय अधीक्षक, निफाड उपजिल्हा रुग्णालय.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news