नाशिक : बिबट्या पकडणे सोपे; पण वानर पकडणे झाले अवघड

वणी : जखमी वानर हाती लागत नसल्याने त्याला पकडण्यासाठी कर्मचा-यांची पराकाष्ठा सुरु आहे. (छाया: अनिल गांगुर्डे) 
वणी : जखमी वानर हाती लागत नसल्याने त्याला पकडण्यासाठी कर्मचा-यांची पराकाष्ठा सुरु आहे. (छाया: अनिल गांगुर्डे) 

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा
येथे अन्न व पाण्याच्या ओढीने आलेल्या तीन वानरांचा मुक्काम तीन-चार दिवसांपासून आहे. डॉ. विराम ठाकरे यांच्या घराजवळील झाडावर तळ ठोकलेल्या या वानरांपैकी एक वानर जखमी असून, त्याच्यावर उपचारांसाठी वनकर्मचार्‍यांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे.

वानराच्या डाव्या हाताला मोठी जखम झालेली असून, ते अगदी शांत बसून असते. त्याला काही खायला दिले तरी ते खात नाही. याबाबत वनविभागाच्या कर्मचार्‍यांना कळविल्यानंतर वनकर्मचारी अण्णा टेकनर यांनी उपचारांसाठी जवळ जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसरी दोन वानरे त्याच्याजवळ येत असल्यामुळे उपचार करणे अवघड झाले आहे. जखमी वानरावर उपचारांसाठी पूर्ण तयारीनिशी वनविभागाच्या सहा ते सात जणांचे पथक आले असून, पिंजराही आणला आहे. मात्र, वानर इकडे – तिकडे उड्या मारत असल्याने वनविभागाचे कर्मचारी सकाळपासून वेगवेगळ्या शकला लढवून त्यास पकडण्याचा प्रयत्न करत असूनही हे जखमी वानर हाती लागत नाही. त्यामुळे एकवेळेस बिबट्या पकडणे सोपे पण वानर पकडणे अवघड आहे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. सकाळी या वानरांनी डॉ. ठाकरे यांच्या सोलरचे पाइप फोडले असून, दिंडोरीच्या वन परिक्षेत्र अधिकारी पूजा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचारी तुंगार, महाले, टेकनर व इतर या वानराला पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news