

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्याच्या अनेक भागांमध्ये मान्सूनच्या दमदार आगमनामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पण, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांना मान्सूनची प्रतीक्षा कायम असून, पाऊस लांबल्याने चिंतेत अधिक भर पडली आहे.
गेल्या आठवड्याच्या प्रारंभी सलग तीन दिवस मान्सूनपूर्व सरींनी जिल्ह्याला झोडपून काढले. या पावसाने वातावरणात बदल होऊन गारवा निर्माण झाल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला. मात्र, हा दिलासा अल्पकाळ ठरला असून, मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ हवामान तयार होते. पण, पाऊस पडत नसल्याचे चित्र आहे.
नाशिक शहर व परिसरात सोमवारी (दि.13) दिवसभर ढगाळ वातावरण व ऊन असा निसर्गाचा खेळ सुरू होता. पण, या विचित्र हवामानामुळे हवेतील आर्द्रता नाहीशी होऊन उकाड्यात प्रचंड वाढ झाली. पारा पुन्हा एकदा 33.7 अंशांवर पोहोचल्याने नागरिकांना घामाच्या धारा लागल्या आहेत. ग्रामीण भागातही शहराप्रमाणे वेगळी परिस्थिती पाहायला मिळत नाही. मान्सूनपूर्व सरींमुळे शेतीच्या कामांमध्ये आलेली लगबग आता काहीशी थंडावली आहे. पावसाचे आगमन लांबल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान, राज्यात मुंबई, पुण्यासह कोकणात मान्सून डेरेदाखल झाला असला, तरी नाशिकसह उत्तर महाराष्ट्राकडील त्याचा प्रवास संथगतीने सुरू आहे. परिणामी चालू आठवड्याच्या शेवटी पाऊस सक्रिय होऊ शकतो. तोपर्यंत मात्र, जिल्हावासीयांना संयम बाळगावा लागणार आहे.
यंदा 44.8 मिमी पावसाची नोंद
जिल्ह्यात 16 जूनपर्यंत साधारणत: 75.6 मिमी पाऊस पडतो. यंदाच्या वर्षी आतापर्यंत एकूण 44.8 मिमी पावसाची नोंद झाली असून, त्याचे प्रमाण 56 टक्के इतके आहे. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 132.4 मिमी पर्जन्य झाले असून, त्या खालोखाल चांदवडला 81.3 मिमी नोंद झाली आहे. नाशिकला 31.9 मिमी पाऊस झाला आहे. पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये अनुक्रमे 10.7 व 5.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे.