नाशिक : जिल्हा टेबल टेनिस संघ जाहीर
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पुणे येथे राज्य शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनतर्फे राज्य मिनी ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मिनी ऑलिम्पिकमध्ये 5 ते 8 जानेवारी या कालावधीत टेबल टेनिस स्पर्धा बालेवाडी येथे रंगणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणार्या नाशिक जिल्हा पुरुष व महिला संघाची नाशिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड व निवड समितीचे चेअरमन शेखर भंडारी यांनी घोषणा केली.
जिल्हा टेबल टेनिस स्पर्धेच्या पुरुष संघात कुशल चोपडा, नुतांशू दायमा, पुनीत देसाई, अजिंक्य शिंत्रे, सुजित कलसेकर यांची निवड करण्यात आली आहे. तर महिला संघात तनिशा कोटेचा, सायली वाणी, मिताली पूरकर, जान्हवी कलसेकर, अनन्या फडके आदींचा समावेश आहे. संघ व्यवस्थापक म्हणून अभिषेक छाजेड व राजेश भरवीरकर जबाबदारी पार पडणार आहेत. तर प्रशिक्षक म्हणून शेखर भंडारी व जय मोडक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मिनी ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर शहरातून काढण्यात आलेल्या क्रीडा ज्योत रॅलीच्या समारोपाप्रसंगी मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते नवनिर्वाचित संघांचा सत्कार करण्यात आला. दोन्ही संघांत निवड झालेल्या खेळाडूंचे संघटनेचे उपाध्यक्ष मिलिंद कचोळे, सचिव राजेश भरवीरकर, संजय वसंत, सतीश पटेल, अलका कुलकर्णी, अलीअसगर आदमजी आदींनी कौतुक केले. दरम्यान, नाशिकचा महिला संघ हा राज्यात प्रथम क्रमांकावर असून, पुरुष संघ तिसर्या क्रमांकावर आहे. त्यामुळे मिनी ऑलिम्पिकमध्ये नाशिकचे खेळाडू कामगिरी करतील, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

