पिंपरी :  हॉटेल व्यावसायिकांसाठी वेळ निश्चित करावी ; हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशनची भूमिका | पुढारी

पिंपरी :  हॉटेल व्यावसायिकांसाठी वेळ निश्चित करावी ; हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशनची भूमिका

पिंपरी :  पुढारी वृत्तसेवा : पुणे पोलीस आयुक्तालयाच्या सुचनेनुसार शहरातील हॉटेल रात्री दीड वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची तरतुद आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातंर्गत याबाबत कोणत्याही स्पष्ट सूचना नसल्याने हॉटेल व्यावसायिकांची गैरसोय होत आहे. तरी, येथील हॉटेल व्यावसायिकांसाठी वेळ निश्चित करण्यात यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.  फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने आयोजित व पिंपरी-चिंचवड हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशनचे पदाधिकारी आणि सभासदांची बैठक नुकतीच चिंचवड येथील पोलीस आयुक्त कार्यालयात घेण्यात आली. त्या प्रसंगी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीला पोलीस सह-आयुक्त मनोज लोहिया, फेडरेशनचे अध्यक्ष गोविंद पानसरे, पिंपरी-चिंचवड ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष रमेश सोनिगरा, दिलीप सोनिगरा, हरीष वर्मा, पिंपरी-चिंचवड हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष पद्मनाभन शेट्टी, उपाध्यक्ष रमेश तापकीर, सचिव सत्यविजय तेलंग, प्लॉस्टिक असोसिएशनचे पदाधिकारी योगेश बाबर, प्लॉय अ‍ॅण्ड लॅमिनेट असोसिएशनचे पदाधिकारी गंगाराम पटेल आदी उपस्थित होते.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर हे यापुर्वी एकाच पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत होते. त्यामुळे पुणे पोलिस आयुक्तालयांच्या परिपत्रकात रात्री 1ः30 वाजेपर्यंत हॉटेल आस्थापना चालु ठेवण्याची तरतुद आहे. तरीही पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची निर्मिती झाल्यानंतर पोलीस आयुक्तांनी हॉटेल्सच्या वेळेबाबत परिपत्रक काढणे गरजेचे होते. मात्र, गेल्या तीन ते चार पोलीस आयुक्तांच्या काळात याबाबत वारंवार मागणी व पाठपुरावा करुनही अशा प्रकारचे परिपत्रक काढण्यात आलेले नाही. वेळेच्या मुद्दयावरुन हॉटेल आस्थापनांविरुद्ध खटले भरले जात असल्याची तक्रार या बैठकीत करण्यात आली.

ही बाब अत्यंत गंभीर असून त्यामुळे व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. त्याचा शासनाच्या महसुलावर अनिष्ट परिणाम होत आहे. औद्योगिक क्षेत्रात शिफ्टमध्ये काम करणार्‍या ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. त्याचप्रमाणे, शहरात अवैध मद्यविक्री मोठ्या प्रमाणात सुरु आहे. ही सर्व वस्तुस्थिती पोलीस सह-आयुक्त लोहिया यांच्या निदर्शनास आणुन देण्यात आली. वेळेबाबतचे परिपत्रक पोलीस आयुक्तांकडून त्वरीत काढण्यात येईल. पुणे शहराशी सुसंगत असे नियम फेम केले जाईल, असे लोहिया यांनी स्पष्ट केले.

Back to top button