नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा
आमदार झाल्यानंतर मनमाड शहरातील छोट्या-मोठ्या समस्या मार्गी लावून या शहराला समस्यामुक्त करण्याचा मी संकल्प केला होता. मी त्या दिशेने काम करत असून, त्यात मला यश मिळत आहे, असे प्रतिपादन शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी केले.
आमदार निधीतून पाच कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या शहरातील शिवाजीनगर, हुडको यासह इतर भागाला जोडणाऱ्या दत्त पुलाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजितसिंग यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार कांदे म्हणाले, शहरातून वाहणाऱ्या रामगुळणा आणि पांझण या दोन्ही नद्यांचा संगम दत्त मंदिराजवळ होतो. या नदीवर असलेल्या पुलाची उंची कमी तर होतीच शिवाय त्यांच्या मोऱ्या लहान होत्या. त्यामुळे या नद्यांना पूर आल्यानंतर त्याचे पाणी तुंबून परिसरातील वस्त्यांत शिरत होते. गेल्या वर्षी हीच परिस्थिती उद्भवली होती. त्यावेळी मी या भागातील जनतेला नवीन पूल बांधून देण्याचे वचन दिले होते. ते वचन आज पूर्ण झाल्याचे समाधान आहे.
कांदे पुढे म्हणाले की, आमदार झाल्यानंतर मी शहरातील पाणीसमस्येचा अभ्यास केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल 350 कोटींच्या करंजवण पाणीपुरवठा योजनेला मंजुरी आणि निधीची तरतूददेखील केली. लोकवर्गणीची ४५ कोटी रुपयांची रक्कम शासनाने भरण्याची विनंतीही त्यांनी मान्य केल्याने पालिकेला लोकवर्गणी भरण्याची गरज राहिली नाही. या शहराला समस्यामुक्त केल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे यांनी प्रास्ताविक केले. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, रिपाइंचे गंगाभाऊ त्रिभुवन, माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे, नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे, नाना शिंदे, अल्ताफ खान आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजितसिंग, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ आहिरे, नांदगावचे मा. नगराध्यक्ष राजेश कवडे, भाजपचे शहराध्यक्ष जयकुमार फुलवाणी, फरहानखान, राजाभाऊ पवार, संजय निकम, सचिन दराडे, डॉ. संजय सांगळे, किशोर लहाने आदींसह शिवसेना – भाजप – रिपाइं, शिवसेना महिला आघाडी, युवा सेना पदाधिकारी, विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.