नाशिक : सातपूरमध्ये डेंग्यूचा डंख, वृद्धाचा मृत्यू ; 40 जणांना लागण

नाशिक : सातपूरमध्ये डेंग्यूचा डंख, वृद्धाचा मृत्यू ; 40 जणांना लागण

सातपूर : पुढारी वृत्तसेवा

सातपूर औद्योगिक वसाहतीमधील ४० नागरिकांना डेंग्यूची लागण झाली असून, खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. डेंग्यूबरोबरच चिकनगुनियाचे रुग्ण आढळून येत आहेत.

डेंग्यूची लागण झाल्याने भगवान पोळ (वय ७०) या जाधव संकुलातील वृद्ध रहिवाशावर उपचार सुरू होते. परंतु उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयात त्याचा रविवारी (दि. २४) रात्री मृत्यू झाला. सातपूर परिसरात खासगी व शासकीय रुग्णालयामध्ये डेंग्यू रुग्णांची उपचारासाठी मोठी गर्दी दिसून येत आहे.

ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाण्याचे डबके साचले असून, नागरिकांना डासांनी हैराण केले आहे. सातपूर गाव, महादेवनगर, कामगारनगर, जाधव संकुल, सातपूर कॉलनी, चुंचाळे, संजीवनगर, अशोकनगर, श्रमिकनगर भागांत डेंग्यू रुग्ण आढळून येत आहे. नागरिकांची हलगर्जी आणि मनपा प्रशासनाच्या वतीने उपाययोजना होत नसल्याने सातपूरला दोन दिवसांत साथीने डोके वर काढले.

नाशिकमध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर साथींच्या आजारांनी नागरिकांची डोकेदुखी वाढली असून, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सिव्हिल हॉस्पिटल आणि खासगी दवाखाने रुग्णांनी भरले आहेत. यात ताप सर्दी, खोकला, पोटदुखी आदी साथींच्या आजारांनी ग्रासलेले रुग्ण वाढत आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news