नाशिक क्राईम : तिघांकडून गावठी कट्टे, काडतुसे जप्त
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दरोडा व शस्त्रविरोधी पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करीत तिघांकडून तीन गावठी कट्टे व पाच जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. एकाच दिवशी कारवाई करीत पोलिसांनी शस्त्रसाठा व संशयित पकडले आहेत.
शहरात गुन्हेगारी वाढल्याने गुन्हेगारांची धरपकड करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार दरोडा व शस्त्रविरोधी पथकाने सापळा रचून सोमवारी (दि.२४) तिघांना गावठी कट्टे व काडतुसांसह पकडले. पहिल्या घटनेत शरणपूर रोड परिसरातून पोलिसांनी प्रवीण विजय त्रिभुवन (२६, रा. त्रिमूर्ती चौक, सिडको) यास पकडले. त्याच्याकडून पोलिसांनी १ गावठी कट्टा आणि एक काडतूस जप्त केले आहे. त्याच्याविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत गंगापूर रोडवरील प्रसाद सर्कल जवळील नाना-नानी पार्क जवळून जयपाल संजय गायकवाड (२४, रा. के. बी. टी. सर्कल, गंगापूर रोड) यास पकडले. त्याच्याकडून १ कट्टा व २ काडतुसे जप्त केली. त्याच्याविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर तिसऱ्या घटनेत सिडकोतील शाहूनगर परिसरातून अक्षय आनंदा सैंदाणे (२६, रा. दत्त चौक) यास पकडले. त्याच्याकडून एक कट्टा व दोन काडतुसे जप्त केली आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक के. टी. रोंदळे, अंमलदार विजयकुमार सूर्यवंशी, मोहन देशमुख, महेश खांडबहाले, प्रवीण चव्हाण, युवराज गायकवाड, सागर बोधले, तेजस मते, संदीप डावरे, भरत राऊत यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
हेही वाचा :

