

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
रिक्षा प्रवास करण्याच्या बहाण्याने प्रवाशांकडील किमती ऐवज चोरणाऱ्या परप्रांतीय टोळीला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने गजाआड केले. तिघांकडे केलेल्या चौकशीत शहरातील ३ गुन्हे उघडकीस आले असून, पोलिसांनी त्यांच्याकडून तीन लाख ४१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
साजिद वाजिद अली (३९), मुस्तकीन बुंदू पस (३९) आणि सोनू उर्फ मोहम्मद आबिद मोहम्मद हुसेन (२८, तिघे रा. बिजनोर, राज्य उत्तर प्रदेश) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. शहरात रिक्षा प्रवासादरम्यान सहप्रवासी म्हणून बसलेले चोरटे किमती ऐवज चोरत असल्याचे प्रकार घडले होते. शुक्रवारी (दि. १४) सायंकाळी ५.३० च्या सुमारास महिला प्रवासी ठक्कर बाजार ते सीबीएस दरम्यान रिक्षा प्रवास करीत होत्या. त्यावेळी सहप्रवासी म्हणून असलेल्या तिघा चोरट्यांनी प्रवासादरम्यान महिलेकडील पाच हजार रुपयांची रोकड, बांगड्या चोरून नेल्या. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. त्यानुसार चोरट्यांचा तपास सुरू असताना अंमलदार प्रशांत मरकड यांना मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक रोडवरील एका गेस्ट हाउसवर पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता, त्यांनी चोरी केल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्यांच्याकडून ५७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १५ हजार ५०० रुपयांची रोकड, असा मुद्देमाल हस्तगत केला. या चोरट्यांनी सरकारवाडा, नाशिकरोड पोलिस ठाण्यांच्या हद्दीत चोरी केल्याचीही कबुली दिली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या सुचनेनुसार अंमलदार रवींद्र बागूल, संदीप भांड, प्रवीण वाघमारे, नाझीम पठाण, विशाल देवरे, विशाल काठे, मुख्तार शेख, आप्पा पानवळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हेही वाचा :