सातारा : बाटेवाडी, मसुगडेवाडी भूस्खलनाच्या छायेतच | पुढारी

सातारा : बाटेवाडी, मसुगडेवाडी भूस्खलनाच्या छायेतच

कराड; पुढारी वृत्तसेवा : दोन वर्षांपूर्वी पाटण तालुक्यातील आंबेघर, मिरगाव, कामरगाव यासह काही गावांमधील घरांवर दरड कोसळून मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली होती. अशीच भयावह परिस्थिती चाफळ खोर्‍यातील बाटेवाडी, मसुगडेवाडीत पहावयास मिळते. या गावचे सुरक्षित ठिकाणी कायमस्वरूपी पुनर्वसन करणे आवश्यक असल्याचा शेरा भूवैज्ञानिकांकडून यापूर्वीच देण्यात आला आहे. मात्र पुनर्वसनाबाबत ठोस कार्यवाही न झाल्याने आजही जीव मुठीत धरूनच भूस्खलनाच्या छायेतच येथील ग्रामस्थांना धोकादायक घरांमध्ये राहावे लागत आहे.

चाफळच्या पश्चिमेस केळोली गावालगतच्या डोंगर कपारीत दुर्गम अशा ठिकाणी वसलेलं बाटेवाडी हे छोटसं गाव आहे. सुमारे तीनशे ते साडेतीनशे लोकसंख्येचे हे गाव. तसेच पाडळोशीनजीक असलेल्या मसुगडेवाडी येथे अतिवृष्टीमुळे दोन वर्षापूर्वी डोंगर खचला होता. दोन वर्षापूर्वी मसुगडेवाडी येथे व बाटेवाडी येथील दोन घरे तीन ते चार फूट सरकली होती. दरवर्षी पावसाळा आला की येथील ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन आपले जीवन जगत आहेत. मोठा पाऊस झाला की घरात पाणी घुसणे नित्याचेच झाले आहे. शासनाच्या भूजल विभाग तसेच भू वैज्ञानिक विभागाने या गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे, असा अहवाल यापूर्वीच दिला होता. त्यानंतर गेल्या दहा ते अकरा वषार्ंत अनेक वेळा प्रस्ताव देऊनही या गावांचे आजपर्यंत पुनर्वसन होऊ शकले नाही, ही एक शोकांतिकाच आहे.

मागील वर्षीच्या पावसातही या गावाशेजारी दरड कोसळली होती. यावेळी प्रशासनाने तात्पुरते निवारा शेड उभारण्यास निधी मंजूर केला. या निवारा शेडसाठी जागा मोजून काही ठिकाणी पायी भरणी झाली आहे. तर काही ठिकाणी थोड्या प्रमाणावर कामही झाले आहे. मात्र, सर्व निवारा शेडचे काम पूर्ण होऊच शकले नाही.

मागील वर्षी पाडळोशीनजीक डोंगराचा काही भाग कोसळून सुमारे दहा शेतकर्‍यांच्या भात शेतीचे तसेच आंब्याच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. भैरेवाडी येथे देखील दहा ते बारा किलोमीटर जमीन खचल्याने काही घरांना धोका निर्माण झाल्याने घरातील लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले होते. बाटेवाडी व विरेवाडी येथे देखील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. तर डोंगराचा काही भाग कोसळून अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. यावेळी ग्रामस्थांना लहान मुलांना घेऊन भीतीच्या छायेखाली भर पावसात रात्र रात्र जागून काढली होती. आता या वर्षीच्या पावसाला नुकतीच सुरुवात झाली असून यापूर्वीच्या भयावह आठवणींमुळे ग्रामस्थ दहशतीखालीच जीवन जगत आहेत.

पावसाळ्यात घ्यावा लागतो पाहुण्यांकडे आसरा…

दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेत बाटेवाडीतील लोक पाहुण्यांकडे वास्तव्यास निघून गेले होते. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत निवारा शेडसाठी निधी मंजूर करून आणला होता. त्यानुसार बाटेेवाडी, मसुगडेवाडी, भैरेवाडी या गावांसाठी निवारा शेड बांधण्यात आली आहेत. मात्र सध्या या निवारा शेडची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.

Back to top button