Nashik Crime : दोघांच्या डोळ्यांत मिरची टाकून लुटण्याचा प्रयत्न

Nashik Crime : दोघांच्या डोळ्यांत मिरची टाकून लुटण्याचा प्रयत्न
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सराफ दुकानात काम करणाऱ्या दोघांच्या डोळ्यांत मिरची टाकून त्यांना लुटण्याचा प्रयत्न जुना गंगापूर नाका परिसरात रविवारी (दि.२५) रात्री घडला. सुदैवाने दोघांनी वाहन न थांबवता थेट सरकारवाडा पोलिस ठाणे गाठल्याने चोरट्यांचा बेत फसला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

सराफ दुकानात व्यवस्थापक असलेले विनोद धनजीभाई कटोरिया (४३, जेलरोड) हे दुचाकीवरून त्यांचे सहकारी विजय प्रभाकर वावरे (३४, परदेशी वाडा, जुने नाशिक) यांच्या सोबत रविवारी रात्री ९.३० च्या सुमारास घरी जात होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून गंगापूर रोडवरील विद्या विकास सर्कलकडून दोघे संशयित चोर दुचाकीने त्यांचा पाठलाग करत आले. खतिब डेअरी ते शंकराचार्य संकुलादरम्यान चोरट्यांनी कटोरिया व वावरे यांना शिवीगाळ करीत वाहन थांबवण्यास सांगितले. चोरट्यांनी कटोरिया यांच्या गळ्यात अडकवलेली काळी बॅगही हिसकवण्याचा प्रयत्न केला. त्यास कटोरिया यांनी प्रतिकार केल्याने संशयितांनी मिरची पूड काढून वावरे व कटोरिया यांच्या डोळ्यांत फेकली व शस्त्राचा वार करण्याचा प्रयत्न केला. कटोरिया यांनी चष्मा घातलेला असल्याने त्यांच्या डोळ्यांना इजा झाली नाही, मात्र वावरे यांना दुखापत झाली. घटनेचे गांभीर्य ओळखून कटोरिया व वावरे यांनी त्यांची दुचाकी थेट सरकारवाडा पोलिस ठाण्यात नेली. संशयितांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र दोघेही न थांबल्याने संशयित पसार झाले.

कटोरिया व वावरे यांनी पोलिसांना आपबिती सांगितल्यानंतर पोलिसांनी संशयितांची शोध मोहीम सुरू केली. तसेच पोलिसांनी दोघांच्या डोळ्यांवर व चेहऱ्यावर पाण्याचा शिडकावा मारून दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सराफ व्यावसायिक हर्षवर्धन ओढेकर यांनी दोघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने या घटनेत चोरट्यांना काही लुटता न आल्याने किंवा दोघांना दुखापत न झाल्याने गंभीर प्रकार टळला. या प्रकरणी कटोरिया यांच्या फिर्यादीनुसार अज्ञातांविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक साजन सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरात सीसीटीव्ही नव्हते. तरीदेखील संशयितांचे व त्यांच्याकडील वाहनाचे वर्णन, प्रत्यक्षदर्शी असल्यास किंवा इतर सीसीटीव्हीमध्ये चोरटे दिसत आहे का याचा शोध घेतला जात आहे. सोमवारी (दि.२६) सायंकाळपर्यंत चोरट्यांना पकडलेले नसल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

आधीच्या प्रकरणाच‌ा अद्यापही छडा नाही

ऑगस्ट महिन्यात याचप्रकारे दुचाकीस्वार चोरट्यांनी तिघा युवकांना बंदुकीचा धाक दाखवून, मारहाण करीत त्यांच्याकडील १२ किलो चांदी चाेरून नेल्याची घटना नाशिक तालुका पोलिस ठाण्यासमोर घडली होती. या प्रकरणाचा छडा अद्याप लागलेला नसताना महिनाभरातच दुसऱ्या सराफ व्यावसायिकाच्या कर्मचाऱ्यांकडील ऐवजावर डल्ला मारण्याचा प्रयत्न झाल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news