

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कर्मवीर, समाजधुरिणांनी अडचणीच्या काळात मविप्र संस्थेची मजबूत पायाभरणी करत संस्था नावारूपाला आणली. मात्र, आता जिल्ह्याबाहेरील बाह्यशक्ती संस्थेत घुसू पाहत आहे. सभासदाच्या हक्काच्या संस्थेला कुटुंब केंद्रीकरणापासून वाचविण्यासाठी परिवर्तन करावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते अंबादास बनकर यांनी केले.
येवल्यात पार पडलेल्या परिवर्तन पॅनलच्या मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर अॅड. नितीन ठाकरे, नंदकुमार बनकर, बाळासाहेब क्षीरसागर, देवराम मोगल, संदीप गुळवे उपस्थित होते. कर्मवीर बाबूराव ठाकरे यांच्या 22 वर्षांच्या कार्यकाळात भरभराट झाली. त्यांनी कधीही प्रांतवाद केला नाही. त्यांचाच समृद्ध वारसा अॅड. नितीन ठाकरे यांच्या रूपाने संस्थेत निवडून जाईल, असा विश्वास बनकर यांनी व्यक्त केला. मविप्र सरचिटणीस फुगवून आकडे सांगत दिशाभूल करीत आहेत. संस्थेच्या अध्यक्षांच्या तालुक्यात पाठिंबा मिळत असल्याचे प्रतिपादन अॅड. ठाकरे यांनी केले. त्यांनी सभासदांना यंदा परिवर्तन घडवून आणण्याचे आवाहन केले. दरम्यान, परिवर्तन पॅनलकडून येवला, नांदगाव, मालेगाव तालुक्यांत जोरदार प्रचार करण्यात आला. दाभाडी, पिंपळगाव, वडनेर खाकुर्डी, सौंदाणे येथेही पॅनलच्या सभा झाल्या.