ठाणे : उपद्रवी गुंड पोलिसांच्या रडारवर

ठाणे : उपद्रवी गुंड पोलिसांच्या रडारवर
Published on
Updated on

ठाणे : पुढारी वृत्तसेवा :  ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी आदी भागात गुंडगिरी करणार्‍या उपद्रवी लोकांवर पोलिसांनी करडी नजर रोवण्यास सुरवात केली आहे. उपद्रवी ठरणार्‍या संभाव्य गुंडांची माहिती गोळा करण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले असून पोलीस आयुक्तालयातील अशा उपद्रवी गुंडांची यादी पोलीस ठाण्यांकडून मागवण्यात येत आहेत. त्यासाठी ठाणे आयुक्तलयातील गुन्हे शाखेत एमओबीचे एक स्पेशल पथक नियुक्त करण्यात आले आहे. उपद्रवी आणि समाजकंटक गुंडांना हद्दपार व स्थानबद्ध करण्याची कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, गेल्या सहा महिन्यात 15 जणांवर एमपीडीए (झोपडपट्टी दादा कायदा) कायद्यानुसार पोलिसांनी कारवाई करीत त्यांना स्थानबद्ध केले आहे.

आगामी गणेशोत्सव, नवरात्र व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर नागरी वस्तीत उपद्रव निर्माण करणार्‍या लोकांची यादी बनवण्यात येऊन पोलीस अशा उपद्रवी लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करतात. त्यासाठी दरवेळी पोलिसांना अशा उपद्रवी लोकांचा गुन्हेगारी रेकॉर्ड शोधून काढावा लागतो. त्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयात गुन्हे शाखेत एमओबीचे एक खास पथक नियुक्त करण्यात आले आहे. हे पथक एकसारखे गुन्हे करणार्‍या आरोपींवर नजर ठेवून त्यांच्यावर मोक्का आणि तडीपारीसह इतरही कठोर कायद्या अंतर्गत कारवाई करतात. त्याच बरोबर पोलिसांनी गुन्हेगारांचा सम्पूर्ण रेकॉर्डच ऑनलाइन केला असून केवळ संशयिताचे नाव समजताच त्या गुन्हेगारांची कुंडली एका क्लिकवर मिळणार आहे. त्यासाठी ठाणे पोलिसांनी एक सॉफ्टवेअर बनवले असून ठाणे पोलिसांना आता अवघ्या काही मिनिटांमध्ये गुन्हेगारांची कुंडली मिळणार आहे.

या तंत्रज्ञानाची आगामी काळात होणार्‍या निवडणुकीत मोठी मदत होणार आहे. त्याच प्रमाणे निवडणूक काळात अमली पदार्थ आणि दारू तस्करीवर देखील पोलिसांचा वॉच राहणार आहे. दरम्यान, कायदा सुव्यवस्था बिघडवणारे गुंड ठाणे पोलिसांच्या निशाण्यावर असून त्यांच्यावर विविध कायद्याअंतर्गत स्थानबद्ध सारख्या प्रतिबंधात्मक कारवाया करून त्यांच्या मुसक्या आवळण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. याच मोहीमेअंतर्गत पोलिसांनी मागील सहा महिन्यात 15 गुंडांना एमपीडीए (झोपडपट्टी दादा कायदा) कायद्यानुसार स्थानबद्ध
केले आहे.

48 गुंडांवर तडीपारीची कारवाई

उपद्रव माजविणे, दहशत पसरविणे, लोकांना धमकी देणे आदी प्रकार करणार्‍या व्यक्तींच्या तडीपारीचे प्रस्ताव पोलीस आयुक्त कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच आगामी गणेशोत्सव, नवरात्र व इतर सणाच्या काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलिसांनी सोशल मीडियावर नजर ठेवली आहे. तसेच 48 गुंडांवर ठाणे व मुंबई शहरातून तडीपार करण्याची कारवाई करण्यात आली असून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक कायद्यानुसार नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत

निवडणूक काळात गुन्हेगार

सक्रिय होण्याची शक्यता ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर या शहरातील संघटित गुन्हेगारी सध्या शांत आहे. प्रमुख टोळ्यांच्या कुठेही उघड कारवाया नाहीत. परंतु या टोळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक काळात सक्रिय होवू शकतात, अशी शक्यता आहे. त्यामुळे गुंडांच्या टोळ्या पोलिसांच्या रडारवर आहे. त्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे शस्त्र हाती घेतले गेले आहे.

गुन्हेगारांची यादी मागविली

ठाणे आयुक्तालयातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून अशा उपद्रवी व हिस्ट्रीशिटर गुन्हेगारांची यादी मागण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त अधिकार्‍यांच्या नियंत्रणात या याद्या बनविल्या गेल्या आहेत. त्या गुंडाची दहशत, सक्रियता पाहून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईचे स्वरूप ठरविले जाणार आहे. एमपीडीए (झोपडपट्टी दादा कायदा) आणि तडीपारी या माध्यमातून गुन्हेगारी कारवायांना लगाम लावला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news