नाशिक : जिल्ह्यातील 12 बाजार समित्यांवर 22 पासून प्रशासक

नाशिक : जिल्ह्यातील 12 बाजार समित्यांवर 22 पासून प्रशासक
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संचालक मंडळाची मुदत संपलेल्या सर्व बाजार समित्यांवर 22 एप्रिलपासून प्रशासक नियुक्ती करण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील 12 कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर प्रशासक नियुक्ती होणार आहे. याबाबत सहकार सचिवांनी आदेश काढून तसे जिल्हा उपनिबंधकांना कळवले आहे. परिणामी दिंडोरी, लासलगाव, घोटी, सटाणा, नामपूर, उमराणे वगळता इतर 12 बाजार समित्यांवर प्रशासक कारभार बघणार आहे.

जिल्ह्यात 17 कृषी उत्पन्न बाजार समित्या असून, त्यापैकी 12 ठिकाणी संचालक मंडळाची मुदत गेल्या वर्षी संपुष्टात आलेली आहे. कोविडमुळे निवडणुका न घेता सरकारने त्यांना वारंवार मुदतवाढ दिली आहे. कोरोना संसर्ग ओसरल्यानंतर मागील वर्षी बाजार समित्यांच्या निवडणुकांंचा कार्यक्रम जाहीर केला. मात्र, विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या निवडणुका झाल्याशिवाय बाजार समित्यांच्या निवडणुका घेऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले आहेत. त्यानुसार बाजार समित्यांचे कार्यरत संचालक मंडळ व प्रशासक यांना 21 जानेवारीच्या आदेशान्वये 23 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याच आदेशाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने प्रशासक नियुक्ती करण्याचे निर्देश दिले होत. त्यामुळे बाजार समित्यांच्या संचालक मंडळाला 22 एप्रिल 2022 च्या पुढे मुदतवाढ देणे शक्य होणार नसल्याने पणन अधिनियम 1963 मधील तरतुदीनुसार जिल्हा उपनिबंधकांनी संचालक मंडळाची निवडणूक होईपर्यंत बाजार समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती करावी, असे आदेश सहकार आयुक्तांनी दिले आहेत. मुदतवाढीचा कालावधी पूर्ण झालेला नाही, अशा बाजार समित्यांना यातून वगळण्यात आले आहे.

सहकार विभागाच्या नव्या आदेशामुळे पिंपळगाव, चांदवड, सिन्नर, मनमाड, येवला, नादंगाव आदी बाजार समित्यांवर प्रशासक नियुक्त होण्याचा अंदाज आहे. लासलगाव बाजार समितीची मुदत 11 मे रोजी संपुष्टात येणार आहे. दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदतही अद्याप आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news