नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्याच्या राहुड घाटातील डोंगरालगत झाडाझुडपांत पिंपळगाव बसवंत येथील संदीप पुंजाहरी सुडके (४०) यांचा मृतदेह बुधवार (दि.१२) सायं. ४ वाजता आढळला. मृतदेहाजवळ एक विषारी औषधाची बाटली आढळली आहे. या घटनेबाबत मृताच्या नातेवाइकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात रात्री आणला होता. रात्री उशिरा याबाबत चांदवड पोलिस तपास करीत होते.
बुधवार (दि.१२) राहुड घाटातील डोंगरात लाकूड तोडण्यासाठी गेलेल्या नागरिकांना दुर्गंधी आली. त्यामुळे त्यांनी जवळ जाऊन बघितले असता त्यांना कुजलेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह दिसून आला. या घटनेची माहिती चांदवडचे पोलिस निरीक्षक कैलास वाघ, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र जाधव, पोलिस उपनिरीक्षक सुरेश चौधरी, पोलिस हवालदार भाऊसाहेब गुळे, बिन्नर यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह हा पिंपळगाव बसवंत येथील संदीप सुडके यांचा असल्याचा तपास पोलिसांनी लावला. या घटनेची माहिती मिळताच मृताच्या नातेवाइकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. मृत संदीप पुंजाहरी सुडके हे शनिवार (दि.८) दुपारपासून बेपत्ता होते. यासंदर्भात पिंपळगाव बसवंत पोलिस स्थानकात बेपत्ताची तक्रार त्यांच्या घरच्यांनी दाखल केल्याचे नातेवाइकांनी सांगितले. सुडके यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
हेही वाचा :