पुणे : रक्तपेढ्यांकडून संकलित होणार हिपॅटिटिस रुग्णांची माहिती | पुढारी

पुणे : रक्तपेढ्यांकडून संकलित होणार हिपॅटिटिस रुग्णांची माहिती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : हिपॅटिटिसचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेने राज्यातील सर्व रक्तपेढ्यांना हिपॅटिटिस बी आणि सी आजाराच्या रुग्णांची माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. परिषदेकडे राज्यातील 373, तर पुण्यातील 37 रक्तपेढ्यांची नोंदणी आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, आजाराचे विश्लेषण केले जाणार आहे.

राष्ट्रीय व्हायरल हिपॅटिटिस नियंत्रण कार्यक्रमाद्वारे 2030 पर्यंत आजाराचे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. राज्यातील 35 जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. राज्यात सध्या नऊ प्रायोगिक उपचार केंद्रे असून, आणखी 27 केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये 15 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे. उपचार केंद्रांद्वारे हिपॅटिटिस बी आणि सीच्या रुग्णांना मोफत तपासणी आणि उपचार दिले जात आहेत.

हिपॅटिटिसचे निदान न झालेल्या रक्तदात्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय पथक राज्यातील कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे मूल्यमापन आणि विश्लेषण करणार आहे. राज्यातील हिपॅटिटिस बी आणि सीच्या तपासणीची उद्दिष्टे केंद्र सरकारने निश्चित केली आहेत. दर तीन महिन्यांनी राज्याकडून पोर्टलवर अहवाल अपलोड केला जाईल.

हिपॅटिटिस बी आणि सीसाठी केलेल्या चाचण्यांच्या संख्येसह नवीन आणि जुन्या रुग्णांचे तपशील रक्त संक्रमण परिषदेकडे पाठवण्याच्या सूचना रक्तपेढ्यांना देण्यात आल्या आहेत. परिषदेला दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत माहिती मिळणे आवश्यक आहे.

            डॉ. अरुण थोरात, सहायक संचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद

Back to top button