मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास आलोक विशाल शिंगारे या बालकाचा मृतदेह आश्रमाच्या पाठीमागील आवारात आढळून आला. मारेकरी अज्ञात असून त्याने आलोकचा गळा आवळून खून केल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी आश्रमातच ठाण मांडून तपासास सुरुवात केली. पोलिसांनी आश्रमातील मुलामुलींसह कर्मचार्यांचीही चौकशी करीत जाबजबाब घेतले. दरम्यान, मृत आलोकचा मोठा भाऊ आयुष याने दिलेल्या माहितीनुसार, आश्रमातीलच विद्यार्थ्यासोबत वाद झाल्यानंतर त्याने आलोकला मारहाण केली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक, अपर अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी व त्र्यंबकेश्वर पोलिसांनी आश्रमात चौकशी सुरु केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या तपासात आलोकच्या मारेकर्याची ओळख पटली तरी खुनाचे कारण अद्याप समोर आलेले नसल्याचे समजते. पोलिसांनी बुधवारी (दि.23) सायंकाळपर्यंत याप्रकरणी कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. खुनाचे कारण उलगडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न आहेत.