

मुंबई : चंदन शिरवाळे : महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार देणारे विविध प्रकारचे उद्योग राज्याबाहेर जात असताना, आता राज्यातील अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे मुंबईतील कार्यालय महिनाभरात दिल्लीला हलविण्यात येणार आहे. तंत्रशिक्षण परिषदेचे हे कार्यालयच आता मुंबईतून हलविले जाणार असल्यामुळे तंत्रशिक्षण महाविद्यालयांच्या प्रशासनाची झोप उडाली असून, पंधराशे कुटुंबांवर स्थलांतराची कुन्हाड कोसळणार आहे. यातील अनेक कर्मचाऱ्यांचा पगार अत्यंत तुटपुंजा असल्याने त्यांना दिल्ली येथे जाऊन आपले कुटुंब चालवणे कठीण होईल. आता काय करायचे, असा प्रश्न या कर्मचाऱ्यांसमोर आहे.
तंत्रशिक्षणाचा प्रसार व्हावा, यासाठी संसदेच्या निर्देशांनुसार प्रत्येक राज्यात आणि प्रमुख शहरांमध्ये तंत्रशिक्षण परिषदेचे विभागीय कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबईत चर्चगेट येथे १९८७ मध्ये हे कार्यालय सुरू झाले. महाराष्ट्रातील तंत्रशिक्षण महाविद्यालयांची संख्या वाढू लागल्याने प्रशासकीय कामकाजासाठी येथील जागा कमी पडू लागल्यामुळे हे कार्यालय पवईत स्थलांतरित करण्यात आले. आता यूजीसीच्या नव्या अध्यक्षांकडे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचाही कार्यभार सोपवण्यात आल्याने हे कार्यालय आता दिल्लीला स्थलांतरित करण्याचा निर्णय या नव्या अध्यक्षांनी घेतला आहे.
राज्यातील १,५०० तंत्र महाविद्यालये या कार्यालयाशी जोडली गेली आहेत. या सर्व महाविद्यालयांना आता प्रशासकीय कामकाजासाठी थेट दिल्लीला फेऱ्या माराव्या लागतील. नवीन महाविद्यालयांसाठी परवानग्या तसेच विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका किंवा पदवी प्रमाणपत्राच्या दुरुस्तीसाठीही दिल्ली गाठावी लागेल.