नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक ग्रामीण पोलिस दलातील रिक्त शिपाई पदाच्या लेखी परीक्षेसाठी रविवारी (दि. २) झालेल्या लेखी परीक्षेत ४५ टक्के उमेदवार गैरहजर होते. लेखी परीक्षेसाठी १ हजार ८७९ पैकी ८४७ उमेदवारांनी लेखी परीक्षेला दांडी मारली. त्यामुळे आता उर्वरित १ हजार ३२ उमेदवारांचा गुणांवर आधारित अंतिम निकाल जाहीर होणार आहे.
नाशिक ग्रामीणच्या १६४ रिक्त शिपाई पदांसाठी दि. २ ते २० जानेवारी या काळात मैदानी चाचणी पूर्ण झाली होती. त्यात ५० टक्के गुण मिळवलेल्या एका पदासाठी 10 उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड झाली होती. त्यांची लेखी परीक्षा रविवारी (दि. २) सकाळी 10 ला घेण्यात आली. बुद्धिमत्ता, गणित, सामान्य ज्ञान, मराठीसह विषयांवर बहुपर्यायी स्वरूपातील 100 प्रश्न विचारण्यात आले होते. उमेदवारांनी सकाळी ६.३० पासून परीक्षा केंद्रात गर्दी केली होती. 'बायोमेट्रिक'द्वारे उमेदवारांची ओळख पडताळून त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. खबरदारी म्हणून परीक्षा केंद्रात पोलिस बंदोबस्त तैनात होता. दरम्यान, याआधी चालक पदासाठी घेतलेल्या मैदानी, लेखी व वाहन चालवण्याची परीक्षा यांचा निकाल जाहीर झाला आहे. प्रवर्गनिहाय अंतिम निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे आता शिपाई पदाच्या लेखी परीक्षेचाही निकाल लवकरच जाहीर होईल व त्यानंतर अंतिम निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.