

Nandurbar woman brutal assault and murder
नंदुरबार : नवापूर तालुक्यातील गंगापूर येथे एका ५५ वर्षीय महिलेवर अमानुष लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, नंदुरबार पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवत मुख्य संशयित आरोपीला १२ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास गंगापूर ते नानगीपाडा रस्त्यालगत एका शेतात ही महिला गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली होती. नातेवाईकांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. प्राथमिक तपासणीत महिलेवर केवळ अत्याचारच झाला नाही, तर नराधमाने तिच्या गुप्तांगावर गंभीर वार करून अमानुष छळ केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) समांतर तपासाचे आदेश दिले. तपासादरम्यान गंगापूर येथीलच मनिल छगन नाईक ऊर्फ टायबू (वय २३) याचे नाव समोर आले. मात्र, गुन्हा केल्यावर तो गावातून फरार झाला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि विसरवाडी ठाण्याचे प्रभारी नरेंद्र साबळे यांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला. तो चिंचपाडा रेल्वे स्थानक परिसरातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना, पोलिसांनी पाठलाग करून त्याला नवापूर रेल्वे स्थानक परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, डीवायएसपी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात:
स्थानिक गुन्हे शाखा: पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि मुकेश पवार, विकास गुंजाळ, अंमलदार राकेश वसावे, मुकेश तावडे, सचिन वसावे, रामेश्वर चव्हाण.
विसरवाडी पोलीस: प्रभारी नरेंद्र साबळे, पोउपनि देविदास वडघुले, रामचंद्र मोहने, सुरेश मोरे, कौतिक कोकणी, लिनेश पाडवी, निखिल ठाकरे, सागर चौधरी व सहकाऱ्यांचा समावेश होता.
आरोपीवर कठोर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.