Nandurbar Liquor Seized | बंद जिनिंग प्रेसमध्ये आढळला कोटींचा अवैध मद्यसाठा; म्हसावद पोलिसांच्या छापेमारीनंतर खळबळ

शहादा तालुक्यातील जावदातर्फे बोरद गावाजवळ पोलिसांनी टाकलेल्या धाडीत सुमारे तीन कोटींचा विदेशी मद्यसाठा जप्त
Shahada Mhsavad Police Raid
Liquor SeizedAI photo
Published on
Updated on

Shahada Mhsavad Police Raid

नंदुरबार : शहादा तालुक्यातील जावदातर्फे बोरद गावाजवळ असलेल्या बंद पडलेल्या हरी ओम फायबर प्रायव्हेट लिमिटेड जिनिंग अँड प्रेसिंग कंपनीवर म्हसावद पोलिसांनी टाकलेल्या धाडीत सुमारे तीन कोटी रुपयांचा विदेशी मद्यसाठा आणि अनेक महागडी वाहने जप्त करण्यात आली. हा मद्यसाठा गुजरातमध्ये तस्करीसाठी पाठविण्याची तयारी सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंद जिनिंग प्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर विदेशी मद्याचा अवैध साठा करण्यात आल्याची गोपनीय माहिती म्हसावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे यांना मिळाली होती. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला.

Shahada Mhsavad Police Raid
Dhule Nandurbar ST bus accident : धुळे नंदुरबार बसला मालवाहू ट्रेलरची जोरदार धडक; चालक गंभीर जखमी

छापेमारीदरम्यान जिनिंग प्रेसच्या आवारात उभ्या असलेल्या १४ चारचाकी वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणावर विदेशी मद्याचा साठा आढळून आला. तसेच आयशर कंपनीचा ट्रक आणि टाटा कंपनीच्या कंटेनरमध्येही मद्याच्या पेट्या भरलेल्या अवस्थेत सापडल्या. पोलिसांनी सर्व वाहने ताब्यात घेऊन मद्यसाठ्याची मोजणी सुरू केली. दुपारपासून सुरू झालेली ही प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

प्राथमिक अंदाजानुसार, जप्त करण्यात आलेला विदेशी मद्यसाठा, विविध वाहने आणि इतर मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे तीन कोटी रुपये आहे. जप्त साठ्यात विविध नामांकित कंपन्यांच्या विदेशी मद्याच्या बाटल्या तसेच मोठ्या प्रमाणात बिअरचा समावेश आहे. कारवाईदरम्यान टोयोटा फॉर्च्यूनर, इनोव्हा, स्कॉर्पिओ, होंडा, इको, विविध पिकअप वाहने आणि दोन मोठी मालवाहू वाहनेही जप्त करण्यात आली.

Shahada Mhsavad Police Raid
Nandurbar Crime | गो- तस्करांना पकडल्यानंतर दोन जमाव भिडले; दगडफेक करीत वाहन फोडले, प्राणघातक हल्ल्यात ५ जण गंभीर जखमी

या प्रकरणामागे मोठे तस्करी रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मद्यसाठा नेमका कोणाचा होता, तो कुठून आणण्यात आला, गुजरातमध्ये कोणाकडे पाठविण्याची तयारी होती आणि या संपूर्ण रॅकेटचा सूत्रधार कोण आहे, याचा सखोल तपास म्हसावद पोलीस करत आहेत.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार मुकेश राठोड, दादाभाई साबळे, विकास कापुरे, अजय पवार, युवराज रावताळे, उमेश पावरा, राकेश पावरा, धीरसिंग वळवी, दीपक पाटील, प्रवीण पवार आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news